जळगावकरांनो.. कुलर एसी दुरुस्त करा, ऐन थंडीत उन्हाचा पारा वाढतोय
जळगाव लाईव्ह न्यूज । 6 फेब्रुवारी 2024 । उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळं राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील गारठा कमी होण्याबरोबरच दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाल्याचं दिसून आलंय. जळगावात दिवसाच्या तापमानात गेल्या चार दिवसात ४ अंशाची वाढ झाली आहे. सोमवारी शहराचा पारा ३३ अंशावर पोहचला होता. तर रात्रीच्या तापमानातही वाढ होऊन पारा १५ अंशावर पोहचला होता.
गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जळगावातील कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने थंडीचा गारठा वाढला होता. मात्र फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाल्यानंतर थंडी गायब झाली असून, तापमानात वाढ होऊ लागली आहे. तसेच आगामी काही दिवसांत तापमानात अजून वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, फेब्रुवारी मध्यापर्यंत जळगाव शहराचा पारा ३५ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. एकंदरीत उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याचे हे संकेत असू शकतात
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा हिवाळ्यातील तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. यासह यंदाच्या उन्हाळ्यावर एलनिनोचा प्रभाव जाणार असून, त्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र राहण्याचीही शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.