जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजवला. संपूर्ण कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, येथील स्थिती पूर्वपदावर येत असताना आता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून 2 ऑगस्टपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानाच्या अधिक माहितीसाठी आयएमडीच्या मुंबई आणि नागपूर वेधशाळेच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.
आजच्या दिवसासाठी हवामान विभागनं ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार 30 जुलै रोजी राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
तर, 31 जुलै रोजी चार जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. 1 ऑगस्टला केवळ रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना पावासाचा अॅलर्ट देण्यात आला आहे.