⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

धोक्याची घंटा! नव्या कोरोना व्हेरिएंट ‘इरिस’ची यूकेत लाट, भारतासाठी धोका?

जळगाव लाईव्ह न्यूज| ७ ऑगस्ट २०२३। तीन वर्षांपासून संपूर्ण जगाला ठप्प करणाऱ्या कोरोनाच सावट आता कुठे निवळले होते. जगभरातील स्थिती जवळपास कोरोनापूर्व काळासारखी झाली आहे. असे असतानाच एक काळजी वाढवणारी बातमी समोर आली आही. युनायटेड किंगडममध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढला असून हा विषाणू मोठ्या प्रमाणात आपले हातपाय पसरवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या नव्या व्हेरिएंटचे नाव EG.5.1 असे आहे, त्याला इरिस असं टोपणनाव देण्यात आलं आहे.

माहितीनुसार, कोरोनाचा इरिस व्हेरिएंट यूकेमध्ये वेगाने पसरत आहे. यूकेतील सातपैकी एका रुग्णाला या व्हेरिएंटची लागण झालीये. रिपोर्टनुसार, यूकेतील 14 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना इरिस विषाणूची लागण झालीये. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्रीय झाल्या असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इरिस विषाणूचे रुग्ण केवळ यूकेमध्येच नाही तर अमेरिका आणि जपानमध्येही आढळून आले आहेत. त्यामुळे जगभरात या विषाणूची लागण झालेले रुग्ण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इरिस व्हेरिएंट जुलै महिन्यात पहिल्यांदा यूकेमध्ये आढळून आला होता. त्यानंतर त्याने देशभरात पसरायला सुरुवात केली. इरिस व्हेरिएंट दुसरा सर्वाधिक प्रबळ व्हेरिएंट असल्याचं सांगितलं जातंय. यूकेच्या आरोग्य संस्थेनुसार, इरिस हा ओमिक्रॉनचाच भाऊबंद आहे. गेल्या आठवड्यात श्वास घेण्यास अडचण येणाऱ्या 5 टक्के रुग्णाची चाचणी घेण्यात आली होती. त्यांच्यात EG.5.1 इरिस हा व्हेरिएंट आढळून आला आहे. या व्हेरिएंटमुळे थोड्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी इरिस व्हेरिएंटची लागण होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे.

इरिस किंवा ओमिक्रॉन EG 5.1 हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे. या व्हेरिएंटची लक्षणे मागील व्हेरिएंटपेक्षा फार वेगळी नाहीत. यात ताप येणे, सर्दी होणे, घशात खरखर, अंगदुखी अशी लक्षणं आढळून येतात असं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा व्हेरिएंट जगात मोठ्या प्रमाणात पसरेल, पण त्यामुळे घाबरुन जाण्यासारखं काही नाही. कारण आता लोकांमध्ये कोरोना विषाणूविरोधात रोगप्रतिकार क्षमता निर्माण झाली आहे. तसेच जवळपास सर्व देशांकडील कोरोना विषाणू विरोधातील लस प्रभावी ठरत आहे.