⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाणी टंचाईचे संकट; जळगाव जिल्ह्यात कुठे हंडामोर्चा तर कुठे टँकरने पाणीपुरवठा

पाणी टंचाईचे संकट; जळगाव जिल्ह्यात कुठे हंडामोर्चा तर कुठे टँकरने पाणीपुरवठा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२३ । यंदा एप्रिल महिन्यातच जळगाव जिल्ह्याला पाणी टंचाईचे चटके बसू लागले आहेत. जळगाव शहर वगळता जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये किमान पाच ते सात दिवस आड पाणीपुरवठा होत आहे. भुसावळला तर १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त नागरिकांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला. काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. अशातच गिरणा, हतनूर धरणांसह अन्य लघु व मध्यम प्रकल्पांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याने आगामी दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण होण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.

चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोलसह अमळनेर तालुक्यातील काही भाग, अशा १५० ते २०० गावांचा पाणीपुरवठा गिरणा प्रकल्पावर अवलंबून आहेत. असे असताना गिरणा प्रकल्पात केवळ ३०.४४ टक्के उपयुक्त जलसाठा असल्याने पाणीटंचाईचे संकट जाणवण्याची शक्यता आहे, तर जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर प्रकल्पावर भुसावळसह अमळनेर, चोपडा व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. हतनूर प्रकल्पात ६३.४३ टक्के साठा आहे. दोन्ही प्रकल्पांतील पातळी झपाट्याने खाली गेली आहे.

गिरणावर अवलंबून असलेल्या तालुक्यांपैकी चाळीसगाव शहरासाठी थेट मोठ्या जलवाहिनीद्वारे तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येतो. पाचोरा व भडगाव शहरात तब्बल पाच ते सात दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. पाचोरा शहराला गिरड केटिवेअर, तसेच बहुळा प्रकल्पावरून पाणीपुरवठा सुविधा असूनही पाच ते सात दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वाघुर प्रकल्पात सद्यःस्थितीत ७४.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यामुळे जळगाव शहराला पाणी टंचाई जाणवणार नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे.

भुसावळाला पालिकेवर हंडा मोर्चा
भुसावळ शहरात १५ दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी भुसावळ पालिकेवर हंडा मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा अडविला त्यानंतर पाणीपुरवठा अभियंत्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर मोर्चेकरी माघारी फिरले. दिलासादायक बाब म्हणजे, भुसावळ शहर, रेल्वे प्रशासन व दीपनगर औष्णिक केेंद्रासाठी दि. १९ रोजी हतनूर धरणातून १२०० क्यूसेकचे आवर्तन सोडण्यात आले. हतनूरच्या या आवर्तनाने सर्व बंधारे तुडुंब भरतील. यामुळे किमान पुढील एक महिन्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटेल.

सद्यःस्थितीत हवामानाचा अंदाज आणि वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहाता ‘अल निनो’मुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याच्या प्रकल्पीय पातळीत प्रचंड घट होत असून, शासन स्तरावरून संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी किमान तीन ते चार महिन्यांसाठी जलनियोजन आराखडा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे मे महिन्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.