जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२५ । गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस नसल्याने गेल्या काही दिवसापूर्वी धरणाचे केवळ दोन दरवाजे अर्घा मीटरने उघडे होते. मात्र आता पाणलोट क्षेत्रात पावसाने दिलासा मिळाला. पावसामुळे धरणात आवक वाढली. आज सोमवारी सकाळी हतनूरचे सहा दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहे. दुसरीकडे यंदाच्या मान्सून हंगामात प्रथमच गिरणा धरणातून विसर्ग केला जात आहे. गिरणा धरणाचा एक दरवाजा ०.२५ मीटरने उघडण्यात आला आहे.

हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस ओसरल्याने गुरुवारी केवळ दोन दरवाजे अर्घा मीटरने उघडून विसर्ग सुरू होता. शुक्रवारी व शनिवारी झालेल्या सरासरी ८ मिमी पावसामुळे पाण्याची आवक वाढली. यामुळे शनिवारी सायंकाळी ५ वाजता धरणाचे सहा दरवाजे एक मीटरने उघडून विसर्ग सुरू झाला. यानंतर रविवारी आणि आज सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी देखील हा विसर्ग कायम होता. यामुळे तापी नदी पात्रात १० हजार २७० क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला.

हतनूर धरणात द्वार परिचालन व पूर नियंत्रण नियमांनुसार १० ऑक्टोबरपर्यंत १०० टक्के साठा केला जातो. यंदा देखील हा साठा होईल. दरम्यान, सध्या धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे तापीचे पात्र खळाळले आहे. हे पाणी पुढे शेळगाव बॅरेजमध्ये येते. तेथून पुढे विसर्ग केला जातो.
दुसरीकडे गिरणा धरणाचा देखील एक दरवाजा ०.२५ मीटरने उघडण्यात आला आहे. यामुळे गिरणा नदी पात्रता १५०० क्युसेक विसर्ग केला जात आहे. दरम्यान गिरणा धरणावर अर्धा जिल्हा अवलंबून असून आजच्या तारखेपर्यंत गिरणेत ६६. २५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी हा साथ ४२ टक्क्यावर होता.







