जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२१ । जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाघूर धरण भरले असून धरणाचे १० दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले आहेत. दरम्यान एरंडोल तालुक्यातील अंजनी मध्यम प्रकल्प देखील भरण्याची शक्यता असून केव्हाही धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहेत. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
एरंडोल तालुक्यातील अंजनी मध्यम प्रकल्प धरणाची सध्याची पाणी पातळी ५२ टक्के असून धरण फक्त ४ ते ५ फूट खाली आहे.
सायंकाळी अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झालेला असल्याने धरणात ५२ टक्के पाणीसाठा झालेला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात सतत वाढ होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा असल्याने धरणाच्या सुरक्षितेच्यादृष्टीने धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे केव्हाही उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येईल.
तरी अंजनी धरणाचे खालील नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून अंजनी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. जीवित वा वित्तहानी टाळण्याच्यादृष्टीने सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव व पाटबंधारे उप विभाग एरंडोल यांचेतर्फे करण्यात आले आहे.