जळगाव लाईव्ह न्यूज : 24 नोव्हेंबर 2023 : राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळत असून कुठे थंडीचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला असून यात जळगाव जिल्ह्याला देखील अलर्ट जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
रविवारी उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसासोबतच वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भमध्येही अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.दरम्यान, दरवर्षी जशी थंडी असते तशीच थंडी उर्वरित नोव्हेंबर महिन्यात असेल. म्हणजेच थंडी असणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत 14 ते 16 डिग्री दरम्यान किमान तापमान असु शकते.
या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थंडी कमी जाणवण्याची शक्यता आहे. खान्देशात थंडीचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदल हा बंगालच्या उपसागरातून 15 डिग्री अक्षवृत्तादरम्यान पूर्वेकडून येणाऱ्या आणि तामिळनाडू केरळ राज्य ओलांडून पश्चिमकडे वाहणाऱ्या मजबूत ‘ पुर्वी वारा झोता ‘ तून वाहणारा हिवाळी मोसमी वाऱ्यामुळं महाराष्ट्रतही जाणवेल.