जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२५ । जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे गिरणा धरण १०० टक्के भरल्यानंतर आता जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. काल सोमवारी धरणातील जलसाठा ९७टक्क्यांवर पोहोचला असून, येत्या दोन दिवसांत ते पूर्णपणे भरेल अशी अपेक्षा आहे. २०१९ पासून सलग सहा वर्षे हे धरण १०० टक्के भरले असून, यंदाही हे धरण पूर्ण भरल्यास सलग सातव्यांदा हे शतक पूर्ण करेल.

वाघूर धरण भरल्यामुळे जळगाव शहराचा आगामी दोन वर्षांसाठीचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यासोबतच भुसावळ आणि जामनेर तालुक्यातील शेती सिंचनासाठीही मोठा फायदा होणार आहे. २०१९ पासून हे धरण सातत्याने १०० टक्के भरत आहे.

१७ पैकी नऊ प्रकल्पांचे शतक पूर्ण
जळगाव जिल्ह्यात ३ मोठ्या आणि १४ मध्यम प्रकल्पांसह एकूण १७ प्रकल्प आहेत. त्यापैकी ९ प्रकल्प १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहेत. मोठ्या प्रकल्पांपैकी गिरणा धरण पूर्ण भरले आहे, तर हतनूर धरणात ६१ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये अभोरा, मंगरुळ, सुकी, हिवरा, तोंडापूर, अंजनी, बोरी आणि मन्याड या प्रकल्पांनी १०० टक्के क्षमता गाठली आहे. मोर आणि बहुळा या प्रकल्पांचीही वाटचाल शंभरीकडे सुरू आहे.
गिरणेच्या पाण्यातून केले जातेय पुनर्भरण !
गिरणा धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून, दररोज ८०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यातून जामदा डावा व निम्न गिरणा कालव्यात पुनर्भरण करण्यात येत असल्याने बंधाऱ्यांसह तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलसाठा उपलब्ध झाला आहे. गिरणा धरण ९६ टक्के भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यातून आवक वाढल्याने शंभर टक्के भरलेल्या गिरणा धरणातील जलसाठ्याला जामदा डावा आणि निम्न गिरणा कालव्याच्या माध्यमातून वाट करुन देण्यात आली. जामदा डावा कालव्याच्या माध्यमातून अंजनी (एरंडोल), म्हसवे व भोकरबारी (पारोळा) धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु झाली. त्यामुळे गेल्या आठवड्यातच भोकरबारी वगळता दोनही प्रकल्प तुडुंब भरले आहे. तर निम्न गिरणा कालव्याच्या माध्यमातून परिसरातील बंधारे, तलावांमध्ये जलसाठ्याची श्रीमंती गवसली आहे.







