जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ मे २०२१ । गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसाने मे महिना उजाडला तरी जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात यंदा ६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जळगावकरांना यंदा पाण्याची समस्या भेडसावण्याची शक्यता कमीच आहे.
उन्हाळा सुरू झाल्यानंतर सर्वत्र पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागते; परंतु जळगाव शहराला पाणीपुरवठा हाेणाऱ्या वाघूर धरणात यंदा ६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जळगावकरांना दाेन वर्षांपासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आल्याने नागरिकांचे हाल झाले हाेते. त्यानंतर पुन्हा दाेन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा पाण्याची समस्या भेडसावण्याची शक्यता कमीच आहे.
यंदा उन्हाळ्याचे तीन महिने संपले असून मे महिना उजाडला आहे. असे असतानाही वाघुर धरणाची शनिवारची पाणीपातळी २३१.७५० मीटर असून धरणात ६९.३१ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती आहे. धरणात पुरेसा जलसाठा असल्याने गेल्या वर्षाप्रमाणे यंदा देखील शहरात पाणीकपातीची कोणतीही शक्यता नाही. जून महिन्यात पावसाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर कटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.