वृद्धास चार वर्षांत ६१ लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्यांना दिल्लीतून अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । शहरातील विद्युत कॉलनीत रहिवासी असलेले टिकाराम शंकर भोळे ( वय ८८, ) यांना विमा कंपनीत गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याची थाप मारून दोन जणांनी ६१ लाख ७९ हजार ५९३ रुपयांचा गंडा घातला. २५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी यातील दोन संशयितांना बुधवारी दिल्लीतून अटक केली. असून, अमितसिंग पिता देवेंद्र प्रकाश सिंग उर्फ अमित शर्मा पिता मुलचंद शर्मा (रा. मोतीराम रोड, मानसरोवर पार्क, शाहदरा नॉर्थ इस्ट दिल्ली) व लखमी चंद पिता राजेश कुमार (जोहरीपूर, दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या भामट्यांची नावे आहेत.
भोळे हे निवृत्त कृषी अधिकारी आहेत. २०१७ मध्ये दीपिका शर्मा नावाच्या महिलेने मोबाइलवर भोळे यांच्याशी संपर्क साधून स्टार हेल्थ कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. ‘तुमचे एलआयसी कंपनीकडे १ लाख ९५ हजार रुपये शिल्लक आहेत. ही रक्कम परत हवी असल्यास मी सांगेन तशी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल’ असे सांगून पत्नीचे आधारकार्ड, पॅन कार्ड, दोन फोटो व २४ हजार २७० रुपयांचा धनादेश त्यांच्याकडून पोस्टाने मागवून घेतला. याचप्रमाणे रॅल हेल्थ इन्शुरन्स कंपनीत ४ लाख ७५ हजार रुपये एवढी रक्कम बाकी असल्याचे सांगून ४० हजार रुपये उकळले. वेळोवेळी पैसे देऊनही समोरून आणखी पैशांची मागणी होत असल्यामुळे भोळे त्रासले होते. त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संबंधित बँक अकाउंट, पत्ते यांची तांत्रिक चौकशी केली. यावरून संबंधित भामटे दिल्लीत असल्याची माहिती मिळाली.
यांनी केली अटक
पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे, उपनिरीक्षक अगंत नेमाने, प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, गौरव पाटील, पंकज वराडे, दीपक सोनवणे, श्रीकांत चव्हाण, सचिन सोनवणे यांच्या पथकाने १९ नोव्हेंबर रोजी दिल्ली गाठली. पोलिसांनी मिळवलेले भामट्यांचे पत्ते चुकीचे असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक पातळीवर चौकशी करून चार दिवसांत दोघांना ताब्यात घेतले. गुरुवारी दोघांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
अमितला जळगाव पाेलिसांनी दुसऱ्यांदा केली अटक
अमित सिंग याला सन २०२० मध्येदेखील जळगावच्या सायबर पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा तशाच प्रकारचे गुन्हे करण्यास सुरुवात केली असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.