भरीत करण्यापेक्षाही मतदान करणं सोपं ; जिल्हाधिकाऱ्यांचा मतदान जागृतीचा अनोखा पॅटर्न
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२४ । प्रत्येक भागाच्या खाद्य संस्कृतीची म्हणून एक ओळख असते.. तशी भरीत हे खान्देशच्या खाद्यसंस्कृतीची आद्य ओळख.. मग हीच खाद्य संस्कृती पोटातून बोटात आणण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी खान्देशच्या किचन मध्ये जाऊन मतदान जागृतीचे केलेले आवाहन हा लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरले.. आणि महिलांना मत देण्याच्या स्वातंत्र्याचा गौरव महिलांमध्ये मत केलंच पाहिजे हे बळ निर्माण करण्यास हा व्हिडीओ कारणीभूत ठरत आहे.
भरीत करण्यापेक्षाही मतदान करणं सोपं
स्त्रियांना एखादी आवडीचा पदार्थ घरच्यांना खाऊ घालायचा असेल तर जरा निवांतवेळ हवा असतो.. अन तो निवांत वेळ सुट्टीचा असतो.. यावर्षी मतदानाला लागून शनिवार, रविवार आहे, त्यामुळे निवांतपणा मिळू शकतो पण मतदान विसरु नये. यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी महिलांच्या किचन मध्ये जाऊन कशी असते भरीत रेसिपी हे जाणून घेतले… ते जाणून घेताना भरीत जसं भाजावं लागतं, नंतर साल काढावी लागते, तसंच मतदान केंद्रावर जाऊन तुम्हाला मतदार यादीत तुमचं नाव बघून, तुमचे ओळख पत्र दाखवून, बोटाला शाई लावली जाते..
तुम्ही साल काढलेल्या वांग्याची पेस्ट करून त्याला कांदा, जिरे, लसूण इतर मसाल्याबरोबर तडका देता मग ते भरीत चवदार होते… तसंच बोटाला शाई लावल्यानंतर मतदान करायला मतदान बॉक्स मध्ये जाऊन तुमच्या मनात क्षणभर विचार येतो त्यावेळी तुम्ही पूर्ण स्वातंत्र्य असता, तुमच्यावर कोणाचाही दबाव नसतो…आणि तुमच्याकडून बटण दाबले जाते.. त्या तुमचं मत असतं त्याला लोकशाही मध्ये अमूल्य असं महत्व असतं.. मग तुम्ही एवढं अमूल्य मत करायलाच हवं.. त्यासाठी कोणतेही कारण न सांगता मतदान करायच… आणि मतदान करणं हे भरीत करण्यापेक्षा सोपं आहे… असं आयुष प्रसाद सांगतात.. त्यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसतो. तेच या व्हिडीओचं बलस्थान आहे.
ह्या व्हिडीओचे अत्यंत दर्जेदार शूटिंग आणि तेवढेच चांगले संपादन जळगावच्या ब्रिज कम्युनिकेशन आणि त्याचे सर्व्हेसर्वा मिलिंद पाटील यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून कोणताही मोबदला न घेता केला.. त्यांच्या या योगदानाबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणूक प्रशासनाच्या वतीने त्यांना धन्यवाद दिले आहेत.
अभिनव कल्पनेचं कौतुक
जिल्ह्यात तर या भरीत व्हाया मतदान जागृती व्हिडीओची चर्चा तर होत आहेच पण हा व्हिडीओ सर्व दूर व्हायरलं झाला आहे, त्याच्या अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया आयुष प्रसाद यांच्या पर्यंत येत आहेत. यातून मतदान टक्केवारी वाढावी हीच निवडणूक प्रशासनाचा प्रयत्न आहे. यावेळी मतदार यादी मध्ये जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नामुळे महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. तो मतदान केंद्रापर्यंत यावा यासाठी विविध उपक्रम हाती घेतले त्यातला हा उपक्रम आहे.
जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या वतीने पुन्हा जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघतील सर्व मतदारांना जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.