जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२६ । एकीकडे जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला असून दोन दिवसानंतर या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. मात्र त्यापूर्वी जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का बसला आहे. शरद पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.]

राजीनामा देण्याचे कारण काय?
विश्वजीत पाटील यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना उद्देशून आपले अधिकृत राजीनामा पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट राजीनामा देण्याचे कारण सांगितले आहे. मी माझ्या वैयक्तीक कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि युवक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकुन माझा सन्मान केला. पक्षाचे नेते, जिल्ह्याचे नेते, तालुक्याचे नेते, पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते यांनी सुद्धा मला प्रेमाची वागणुक दिली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आजन्म ऋणी राहील, असे विश्वजीत पाटील यांनी म्हटले आहे.

मात्र, विश्वजीत पाटील यांनी दिलेल्या राजीनाम्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेक मातब्बर सोडून गेल्यानंतर शरद पवार गटाकडून सध्या संघटनात्मक मजबुतीवर भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत युवक संघटनेतील जिल्हास्तरीय नेतृत्वाचा राजीनामा पक्षासाठी मोठे आव्हान ठरू शकतो, असे बोलले जात आहे.

आगामी काळात जळगाव जिल्ह्यात युवक नेतृत्वाची नवी फळी उभारण्याचे आव्हान राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वासमोर उभे राहणार आहे. दरम्यान, विश्वजीत पाटील यांनी आपल्या राजीनामा पत्रात पक्ष व नेतृत्वाबद्दल आदरभाव व्यक्त केल्याने त्यांनी कोणत्याही पक्ष विरोधी भूमिकेचा संकेत दिलेला नाही. त्यामुळे ते भविष्यात कोणती राजकीय भूमिका घेतात, पुन्हा सक्रिय राजकारणात दिसतात की विश्रांती घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


