⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Varanasi Breaking : ‘ज्ञानवापी’समोर नमाज पठणासाठी जमली शेकडोंची गर्दी, पोलिसांनी केले आवाहन..

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर तो भाग सील करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने उन्हाळी सुटीनंतर दि.६ जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवलेली आहे. दरम्यान, शुक्रवारच्या नमाज पठणसाठी शेकडो नागरिकांनी ज्ञानवापी मशिदीसमोर गर्दी केल्याने पोलिसांची आणि प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. अचानक नागरिकांची गर्दी झाल्याने पोलिसांनी त्यांना घरी जाण्याचे आवाहन केले. गुरुवारी वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील बैठक घेत शांततेचे आवाहन नागरिकांना केले होते.

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी दि.६ जुलै रोजी ठेवलेली आहे. ज्ञानवापीबाबत 1991 मध्ये दाखल झालेल्या खटल्याची सुनावणी करता येईल की नाही, याचा निर्णय उच्च न्यायालयाने घ्यायचा आहे. याप्रकरणी दि.१६ मे रोजी झालेल्या सुनावणीत हिंदू पक्षाचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही. पुढील सुनावणीत तो युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर मुस्लिम पक्ष आपले युक्तिवाद मांडतील. वझूखान्यात शिवलिंग सापडल्यानंतर तो परिसर सील करण्यात आला आहे. तसेच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ANI वृत्तसंस्थेने केलेले ट्विट

शुक्रवारी दुपारच्या नमाजसाठी अचानक मोठा जमाव ज्ञानवापी मशिदीसमोर जमले होते. अचानक आलेल्या जमावामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. पोलिसांनी मैदागीन चौकातूनच नमाजासाठी आलेल्या लोकांना परत जाण्याचे आवाहन केले. तसेच घराजवळ किंवा आपल्या घराच्या परिसरातील मशिदीत नमाज अदा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. गुरुवारी मशिदी व्यवस्थापनाने किमान लोकांना आवारात येण्याचे आवाहन केले होते. मात्र शुक्रवारच्या नमाजासाठी नागरिकांची अचानक गर्दी वाढली. सध्या मशिदीच्या परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ANI वृत्तसंस्थेने केलेले ट्विट

तत्पूर्वी, डीएव्यवस्थापनाने गुरुवारी आवाहन करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी मशीद समिती आणि मुस्लिम धर्मगुरूंसोबत बैठक घेतली. यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. यासोबतच वझूमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मशिदीमध्ये वूजूच्या पाण्याचे दोन ड्रम ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच मशिदीत कोणीही सीलबंद परिसरात जाण्याचा प्रयत्न करू नये किंवा परिसर सील करण्यासाठी लावलेल्या नऊ कुलूपांमध्ये छेडछाड करू नये, अशा आशयाची नोटीस देखील बजावण्यात आली आहे.