⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जळगाव जिल्ह्यात रानडुकरांच्या शिकारीसाठी बॉम्बचा वापर!

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ डिसेंबर २०२२ | रानडुकराच्या शिकारीसाठी शेतात ठेवलेल्या फटाक्याच्या दारूच्या गाठोड्याला हात लागताच त्याचा स्फोट होवून एका महिला गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोरा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी फटाक्याची दारू ठेवणार्‍या विरूद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. जखमी महिलेवर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. या आधीही अशा प्रकारच्या घटनांमध्ये शेतकरी जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत. जिल्ह्यात अनेक भागांमध्ये रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ते पिकांची नासाडी करतात. मात्र वन विभागाकडून रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी ठोस पाऊले उचलली जात नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. यामुळे रानडुकरांचा बंदोबस्त कण्यासाठी शेतकर्‍यांकडून धोकादायक पध्दतीचा वापर केला जातो. तर काही ठिकाणी शिकार्‍यांकडूनही गावठी बॉम्बचा वापर केला जात असल्याचे दिसून येते.

रानडुकरांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. रानडुकरांच्या टोळ्या शेतात घुसून संपूर्ण पिक उद्ध्वस्त करतात. यामुळे रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी शेतकरी विविध पध्दतींचा वापर करत असतो. शेतकर्‍यांना संपूर्ण शेतात कंपाउंड अर्थात संरक्षण भिंत उभारणे शक्य नसल्याने शेतकर्‍यांकडून अन्य पर्यायांचा वापर केला जातो.

यातील सर्वात धोकदायक प्रकार म्हणजे फटाक्यांच्या दारूने छोटे बॉम्ब तयार करुन ते पिठाच्या गोळ्यांमध्ये किंवा अन्य पध्दतीने शेतात ठेवणे. अशा गावठी बॉम्बचा स्पोट होवून रानडुकरे मरतात किंवा आवाजाने पळून जातात. मात्र अशा प्रकारामुळे शेतकरी किंवा अन्य लोकं जखमी होण्याची शक्यता अधिक असते. रानडुरानडुकराच्या मादीला एका वेळी १०-१२ पिले होतात, त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते. मात्र त्यांच बंदोबस्त वन विभागाकडून केला जात नाही. रानडुक्करांनी शेतपिकाचे नुकसान केल्यास हेक्टरी कमीतकमी एक हजार व जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. मात्र अनेक शेतकर्‍यांना त्याची माहिती नसते.

नेमकी काय आहे घटना?

पाचोरा तालुक्यातील लासगाव शिवारात श्रावण कुंभार यांची ही २ बिघे शेतजमीन आहे. श्रावण कुंभार यांची सून सीमाबाई कुंभार या शेतात कापूस वेचत होत्या. सीमाबाईंनी कापूस वेचताना एक लहान गाठोडी जमीनीवर पडलेली दिसली. या गाठोडीत काय आहे, ते पाहण्यासाठी उचलली असता त्याचा स्फोट झाला. कापूस वेचण्यासाठी मध्य प्रदेशातून आलेल्या गयाराम शिवरलाल चव्हाण (रा. पारदीपुराराला नंदगाव, जि. सिहोर) याने रानडुकरे पकडण्यासाठी एका गाठोड्यात फटाक्यांची दारु भरुन ठेवल्याचे समोर आल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.