‘दीपस्तंभच्या यशोत्सवा’त होणार यूपीएससी, एमपीएससी गुणवंतांचा गौरव
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशन परिवारातील ६ सदस्य यूपीएससी तर १९ सदस्य एमपीएससी परीक्षेत यशस्वी झाले आहेत. या यशवंत विद्यार्थ्यांचा कौतुक व शुभेच्छा सोहळा रविवार दि.१७ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजीत करण्यात आला आहे.
‘दीपस्तंभ यशोत्सव’ या कार्यक्रमात दीपस्तंभ फाउंडेशन परिवारातील यूपीएससी, एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. रविवार दि.१७ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. कार्यक्रमात ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ या पुस्तकाचे लेखक आणि ओरिसा राज्यात बारा वर्षे कर्तव्यदक्ष सेवा बजावून राष्ट्रपती व पंतप्रधान पुरस्कार प्राप्त खान्देशचे सुपुत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांचा विशेष सन्मान होणार आहे. सोबतच दीपस्तंभ परिवारातील यूपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन करणारे गौरव साळुंखे, श्रीराज वाणी, अक्षय साबद्रा, श्रीकांत कुलकर्णी, विनायक नरवाडे, प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यामध्ये यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून उत्तीर्ण झालेल्या पूजा कदम, एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम आलेल्या मानसी पाटील (उप जिल्हाधिकारी ) तसेच महाराष्ट्रात अनाथ विध्यार्थ्यांमध्ये सर्व प्रथम अधीकारी होणारे वन अधिकारी नारायण इंगळे यांच्यासह इतर परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, संयुक्त आयकर आयुक्त विशाल मकवाना उपस्थित राहणार आहेत. कोरोना परिस्थिती व योग्य ती काळजी घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन करण्यात आले असून कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन यजुर्वेंद्र महाजन यांनी केले आहे.