जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यावर्षी घेण्यात आलेल्या ८६० जागांसाठीच्या परीक्षांचे अंतिम निकाल आज जाहीर झाले असून यात दीपस्तंभ परिवारातील सदस्य तसेच अभिरूप मुलाखत प्रशिक्षण कार्यक्रमातील चौदा सदस्यांपैकी चार प्रशिक्षणार्थींची अंतिम निवड झालेली आहे. यात चोपडा येथील गौरव साळुंखे, जळगांव येथील चार्टर्ड अकाउंटंट अक्षय साबदरा, भुसावळ येथील श्रीराज वाणी या खान्देशी उमेदवारांनी यूपीएससी परीक्षेत यशाची पताका फडकावली आहे. या उमेदवारांनी दीपस्तंभ फाउंडेशनच्या अभिरूप मुलाखत प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षण घेतलेले आहे.
गौरव साळुंखे याने देशात १८२ रँक प्राप्त केली आहे. गौरव हा चोपडा येथील रहिवासी असून रवींद्र साळुंखे आणि सुरेखा साळुंखे यांचा चिरंजीव आहे. रवींद्र साळुंखे व सुरेखा साळुंखे हे दोन्ही शिक्षक असून गौरवचे दहावीपर्यंतचे शिक्षण प्रताप विद्या मंदिर चोपडा येथे तर बारावीपर्यंतचे शिक्षण आर्टस् कॉमर्स सायन्स महाविद्यालय चोपडा येथे झालेले आहे .त्यानंतर गौरवने सिंहगड महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. गौरव साळुंखे याने इयत्ता दहावी नंतर युपीएससी CSE साठी तयारी करायची हे ठरवून दीपस्तंभ फाउंडेशनच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे.
अक्षय साबद्रा याने ४८० रँक प्राप्त केली असून अक्षय हा अक्षय मेडिकलचे संचालक प्रमोद नयनसुख साबद्रा आणि विनिता साबद्रा यांचा चिरंजीव आहे. त्यांनी आपली पदवी बीकॉम पर्यंत शिक्षण घेऊन नंतर सीए परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्यानंतर युपीएससी परीक्षेसाठी तयारी करीत होते.
भुसावळ येथील श्रीराज मधुकर वाणी यांनी रँक प्राप्त केली आहे. श्रीराजने दहावीपर्यंतचे शिक्षण महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ तर बारावीचे शिक्षण पुणे येथे गरवारे महाविद्यालयात पूर्ण केले आहे. त्यानंतर आयसीटी मुंबई येथे पदवीचे तंत्र शिक्षण पूर्ण केलेले आहे. मधुकर वाणी हे शिक्षक असून आई सुनंदा वाणी ह्या नोकरी करतात.
या यशवंतांना पोलीस महानिरीक्षक डॉ.सुहास वारके, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, अप्पर आयुक्त संदीप कुमार साळुंखे, सहा.आयकर आयुक्त विशाल मकवाने, आयएएस राजेंद्र भारूड, आयआरएस डॉ.उज्वल कुमार चव्हाण यांच्यासह यजुर्वेंद्र महाजन तसेच खान्देशातील अक्षय अग्रवाल, मयूर सूर्यवंशी, डॉ.अभिजित चौधरी, मनोज महाजन, डॉ.सौरभ सोनवणे, महेश चौधरी या सर्व आयएएस अधिकारी यांनी तसेच धीरज मोरे (IRS), दिग्विजय पाटील (IFS) , केतन पाटील (IPS) यांनी अनमोल मार्गदर्शन केले आहे.
या यशाबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत, दीपस्तंभचे भरत अमळकर, चार्टर्ड अकाउंटंट तेजस कावडीया, कस्तुरचंद बाफना यांनी यशस्वीतांचे अभिनंदन केले.