शूरवीराच्या शौर्याचा गौरव: पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते शहीद जवान सुनील पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांकडून ‘गौरव सलामी’
जळगाव | मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या 9 वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील धनराज पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळगावी घोडगाव (ता. चोपडा) येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे हे होते. या वेळी जिल्ह्यातील २८ शहीद जवानांच्या स्मारकांसाठीशासनाची मान्यता घेवून लवकरच DPDC निधी मंजूर करून भव्य स्मारकं उभारण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली.
या भावनिक प्रसंगी हजारो ग्रामस्थ उपस्थित राहिले. ‘जय हिंद’ च्या गजरात झालेल्या या कार्यक्रमात शूर जवानाला अभिमानाने मानवंदना देण्यात आली.
पालकमंत्र्यांचे गौरवोद्गार !
“सुनील पाटील फक्त शेतकऱ्याचा मुलगा नव्हता, तर तो मातृभूमीचा सच्चा शूरवीर होता. त्याच्या शौर्याचे हे स्मारक पुढच्या पिढ्यांना देशभक्तीचा प्रेरणादायी संदेश देत राहील,” असे उद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले.
गौरव सलामीचा अभिमान:
या वेळी शहीद जवानाच्या पुतळ्याला ‘ गौरव सलामी ‘ देण्यात आली. ही एक सशस्त्र व शिस्तबद्ध सन्मान परंपरा असून, ती विशिष्ट शूरवीर, मान्यवर किंवा शहीद यांच्यासाठी दिली जाते. 44 वी वाहिनी भारत-तिब्बत सीमा पोलिस बल, बेलगाव (कर्नाटक) येथून आलेल्या पथकाने ही सलामी दिली. या पथकात सहभागी अधिकारी व जवान
निरीक्षक (जी.डी.) सत्यपाल, सहायक उप निरीक्षक (शिक्षण व तणाव परामर्शदाता) संजय कुमार, हैड कॉन्स्टेबल देसले रामकृष्ण, गुगरे दीपक,सिपाही पाटील रविराज, सुर्वे प्रवीण, चंदन शिव कैलाश, लौहार आदित्य, नलवाडे श्रीधर, कलांबे रोहित आणि भोसले पंकज यांचा सामावेश होता.
शहिदाच्या कुटुंबासाठी मदतीचा हात
या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या वतीने शहीद जवानाच्या लहान मुलीच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांची मदत माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते ही रक्कम सुपूर्त करण्यात आली.
‘जय हिंद’च्या गजरात नमन
सिंदूर ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या जवानांना सन्मानपूर्वक सलाम करण्यात आला. आमदार चंद्रकांत सोनवणे म्हणाले, “सुनील पाटील यांनी ‘माझा देश हाच माझा प्राण’ ही भावना मनाशी ठेवून सेवा बजावली. त्यांच्या बलिदानामागे त्यांचे कुटुंब हे खरे नायक आहे.”
पार्श्वभूमी – वीर जवान सुनील पाटील यांचे शौर्य
सुनील पाटील यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९८८ रोजी घोडगाव येथे झाला. प्राथमिक शिक्षण सौंदाणे येथे झाले. माध्यमिक शिक्षण वडजाई व घोडगाव येथे पूर्ण करून त्यांनी SSVPS, धुळे येथून बी.ए. पदवी घेतली. २००९ मध्ये ITBP मध्ये भरती झाल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. २०२१ पासून मणिपूरमधील मोइरंग येथे तैनात होते. ५ ऑगस्ट २०२४ रोजी तेथे कर्तव्य बजावत असताना त्यांनी वीरमरण प्राप्त केले.
हा कार्यक्रम नव्हे, तर श्रद्धांजलीचा दीप
शहीद जवानाच्या त्यागाची, कुटुंबाच्या धैर्याची आणि देशप्रेमाच्या ऊरकाची साक्ष देणारा हा कार्यक्रम प्रत्येक उपस्थिताच्या अंत:करणावर अमिट छाप उमटवणारा ठरला.