जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२६ । महाराष्ट्रातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल होत असून एकीकडे थंडीचा जोर ओसरून उन्हाचा चटका वाढला असताना अशातच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसला आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशातच आजही हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाकडून विदर्भ आणि मराठवाडा विभागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कर्नाटकापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी?
विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये आज विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार असून उन्हाळ्याच्या दिवसांतील तापमान वाढ सुरूच राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असल्याचे चित्र आहे. निफाड येथे राज्यातील नीचांकी 12.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर ब्रह्मपुरी येथे उच्चांकी 36.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. एकाच दिवशी थंडी, ऊन आणि पाऊस अनुभवावा लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, जळगावच्या तापमानत चढ उतार सुरु असून काल किमान तापमानात किंचित घसरण दिसून आली. यामुळे रात्री काहीसा गारवा जाणवला. मात्र दिवसाचा उन्हाचा चटका कायम आहे. सोमवारी जळगावचे किमान तापमान १६ अंश, तर दिवसाचे कमाल तापमान ३५.८ अंश इतके होते. जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाचा अंदाज नसून मात्र मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.





