हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला ; राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी, जळगावात कशी राहणार स्थिती?
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२३ । एकीकडे राज्यात थंडीची चाहूल लागली असताना राज्यात अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्या निर्माण झाला आहे. परिणामी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला आहे.
आज बुधवारी पहाटेपासूनच कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे.दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मागील काही दिवसापासून राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. राज्यात तापमानाचा पारा घसरला असून राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पीके काढणी सुरु असून त्यातच अवकाळीचं संकट येऊन ठेपल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.दरम्यान, येत्या २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शेतकऱ्यांनी खरीप पीकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील हवामान खात्याने केलं आहे.
या जिल्ह्यात पावसाची हजेरी
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. आज म्हणजेच बुधवारी पहाटेच्या कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाकडून वर्तवली गेली आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. तर, उर्वरित राज्यात काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याने थंडी कमी जाणवणार आहे.
जळगावात कशी राहणार स्थिती?
जळगाव शहरासह जिल्ह्यातील हवामानात देखील बदल जाणवत आहे. शहरात गेल्या दोन दिवसापासून सकाळपर्यंत थंडी व दुपारी उन्हाचे झळा असे विषम वातावरण आहे. सकाळी हुडहुडी जाणवते आहे तर दुपारी तापमान ३५ अंशावर पोहोचून उन्हाचे चटके बसत आहे. दरम्यान, जिल्ह्यात १० नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान, तुरळक पावसाचे संकेत हवामान खात्याकडून वर्तविण्यात आले आहे.