⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

७० वर्षांपासून बिनविरोध निवडणूक; जळगाव जिल्ह्यातील या गावाचा ‘आदर्श पॅटर्न’

जळगाव लाईव्ह न्यूज : २२ मार्च २०२३ : निवडणूक म्हटली की, चुरस, स्पर्धा, इर्शा आलीच. त्यातल्या त्यात गावपातळीवरच्या निवडणुका राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकांपेक्षा जास्त चुरशीच्या असतात, असा आजवरचा अनुभव आहे. काही गावांमध्ये नेतेमंडळी किंवा ग्रामस्थांच्या पुढाकाराने बिनविरोध निवडणुका होतात. मात्र नेते बदलले की राजकीय समिकरणे बदलतात. मात्र जळगाव जिल्ह्यातील एक गाव असं आहे की नेते व ग्रामस्थांच्या पिढ्या बदलल्या तरी तब्बल ७० वर्षांपासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा अद्यापही कायम आहे. हे गाव म्हणजे भडगाव तालुक्यातील कजगाव!

कजगाव येथील नूतन विकास सोसायटीची निवडणूक तब्बल सत्तर वर्षांची परंपरा राखत बिनविरोध झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कजगाव नूतन विकास सोसायटीच्या निवडणुकीकडे शेतकर्‍यांसह ग्रामस्थांचे लक्ष लागून होते. यंदा माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत काही उमेदवारांचे अर्ज कायम असल्याने बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित होते की काय? अशी चिन्हे दिसू लागली होती. मात्र माघारीच्या शेवटच्या दिवशी दोन्हीकडील पॅनलप्रमुखांनी बसून, निवडणूक खर्च व गावातील सलोखा लक्षात घेता ही निवडणूक पारंपरिकरित्या बिनविरोध पद्धतीने पार पडली.

हे आहेत नवनिर्वाचित संचालक
नवनिर्वाचित संचालक म्हणून स्वप्नील पाटील, रामदास महाजन, वासुदेव पाटील, शिवाजी बोरसे, निंबा महाजन, बालू पाटील, रवींद्र पाटील, हिलाल वाघ, प्रताप पाटील, भानुदास मोकळ, वैष्णवी पाटील, कासुबाई पाटील, जिजाबाई पवार यांची संचालक म्हणून निवड झाली आहे. तर निवडणूक कामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले तर त्यांना संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील व संस्थेचे सेल्समन दादाभाऊ पाटील यांनी सहकार्य केले.

विविध कार्यकारी सोसायटी म्हणजे काय?
गावपातळीवर शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करणारी सर्वात मोठी संस्था म्हणजे विविध कार्यकारी सोसायटी. ज्यास विकासो असेही म्हटले जाते. ग्रामीण भागामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत शेतकर्‍यांना कर्जपुरवठा केला जात असल्याने या सोसायट्या शेतकर्‍यांचा मुख्य आधार असतो. या सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना पीक कर्जही देण्यात येते. पीक कर्जाबरोबरच खते, बियाणे, शेतीची अवजारे यासाठीही सोसायट्या कर्जपुरवठा करतात. शेतकर्‍यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यात विविध कार्यकारी सोसायटीचे मोलाचे योगदान आहे.

अशी असते संचालक मंडळाची रचना

  • संस्थेच्या उपविधीत संचालक मंडळाची सभासद जेवढी जास्त असेल, तेवढेच सोसायटीच्या संचालक मंडळामध्ये संचालक असतील.
  • संचालकांची संख्या कोणत्याही परिस्थितीत १३ पेक्षा अधिक असणार नाही.
  • नव्या ९७ व्या घटनादुरुस्तीमुळे १३ संचालकांपैकी एक जागा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटकी जमात किंवा विमक्त मागास प्रवर्ग यांसाठी आणि महिलांसाठी दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.