जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर पंचायत समिती सभापतीपदी तालुक्यातील निमखेडी बु. गणातील सुकळी येथील विकास समाधान पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शुक्रवार दि.८ रोजी पंचायत समिती सभागृहात निवडीची सभा पार पडली.
मुक्ताईनगर पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा साळुंखे यांनी राजीनामा दिल्याने सभापतीपद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या जागेसाठी शुक्रवार दि.८ रोजी पंचायत समिती सभागृहात सभापती निवडीसाठी सभा पार पडली. पीठासन अधिकारी तहसीलदार निकेतन वाडे अध्यक्षस्थानी होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास निवडीची प्रक्रिया पार पडली. तहसिलदार निकेतन वाडे यांनी विकास पाटील यांची निवड केल्याची घोषणा केली. यावेळी उपसभापती सुनिता चौधरी, सदस्य शुभांगी भोलाणे, विद्या पाटील, राजेंद्र सावळे, माजी सभापती विलास धायडे, राजु माळी, योगेश कोलते, चंद्रकांत भोलाणे, विनोद तराळ, पवनराजे पाटील व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वसामान्य व्यक्तींना संधी
तीस वर्षांपासून माजी आ. एकनाथराव खडसे व रोहिणी खडसे यांनी या पदासाठी सर्वसामान्य व्यक्तींना संधी दिल्याबद्दल आभार मानावे तितके कमीच आहेत, अशी प्रतिक्रिया विद्यमान सभापती विकास पाटील यांनी ‘जळगाव लाईव्ह न्युज’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.