जळगाव जिल्हा

उन्मेष पाटीलांनी थेट नदीत उतरून आंदोलन छेडलं; नेमकं प्रकरण काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२४ । ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी खान्देश हित संग्रामचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह गिरणा नदीपात्रात अर्धनग्न होऊन जलसमाधी आंदोलन केलं. खरंतर नार-पार नदीजोड प्रकल्प केंद्राकडून मंजूर व्हावा आणि लवकरात लवकर व्हावा यासाठी गिरणा नदीपात्रात आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने नार-पार नदीजोड प्रकल्प रद्द केल्याची माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी संसदेत दिली आहे. या प्रकल्पावरुन खान्देशात संतापाची लाट उसळताना दिसत यानंतर वातावरण तापत असल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी माहिती दिली. राज्यपालांच्या स्वाक्षिरीने नार-पारचा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

पण तरीही आंदोलकांना विश्वास नाही. केंद्राकडूनच प्रकल्प नामंजूर झाल्याने त्याचं भवितव्य धोक्यात आलं आहे. हा प्रकल्प केंद्राकडून मंजूर व्हावा आणि लवकरात लवकर व्हावा, यासाठी गिरणा नदीपात्रात अर्धनग्न होऊन जलसमाधी आंदोलन सुरू आहे. जळगावच्या चाळीसगांव तालुक्यातील गिरणा नदीपात्रात हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील हे स्वत: सहभागी झाले आहेत. ते स्वत: नदीत उतरले आहेत. त्यामुळे नार-पार योजनेसाठी गिरणा पट्ट्यातील शेतकरी, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे.

जोपर्यंत नारपार योजनेला प्रशासकीय मान्यता मिळत नाही, तोपर्यंत गिरणा नदी पात्रात हे आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी अग्निशामक दल तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत. मेहुनबारे पोलीस या आंदोलनावर करडी नजर ठेवून आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी इथे आल्याशिवाय आणि लेखी आश्वासन पत्र घेतल्याशिवाय आंदोलन बंद करणार नाही, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button