जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२४ । चाळीसगावात माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. यादरम्यान भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना उन्मेष पाटील यांची जीभ घसरली. “खानदेशचा सुपुत्र जलसंपदा मंत्री झाला आणि त्या हरामखोर गिरीश महाजनने 19 टीएमसीवरून 8 टीएमसीवर पाणी नेलं”, अशा शब्दांत उन्मेष पाटलांनी मंत्री गिरीश महाजनांवर निशाणा साधला.
गिरणा खोऱ्याच्या समृद्धीसाठी आणि नारपार प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी नारपार बचाव समितीतर्फे चाळीसगाव येथे भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात 100 पेक्षा अधिक ट्रॅक्टर सहभागी झाले होते. उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि विविध संघटना मिळून हा मोर्चा काढण्यात आला होता.
यादरम्यान, उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली. “माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर राज्य शासनामध्ये गिरीश महाजन पहिल्यांदा जलसंपदा मंत्री झाल्यामुळे ते नारपारचं पाणी आम्हाला देतील, असं आम्हाला वाटत होतं. पण गिरीश महाजन यांना वेळ नव्हता. त्यांना नारपार माहिती नाही. ते नारपारला आरपार म्हणतात आणि जेव्हा खानदेशचा माणूस गुजरातमध्ये जाऊन म्हणतो की आम्हाला हा प्रकल्प रद्द करावा लागेल तेव्हा म्हणावं लागतं की हमे तो अपनों ने लुटा गैरो मे कहाँ दम था, हमारी कश्ती वहा डुबी जहाँ पाणी कम था”, अशी टीका उन्मेष पाटील यांनी केली.
“महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्राला मिळायला पाहिजे. नारपारच्या पाण्याबाबत गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. नदीजोड प्रकल्प झाले पाहीजे हे अटलजींचे स्वप्न होतं. ही अटलजींची भाजप राहिली नाही. अटलजी म्हणायचे, छोटे मनसे कोई बडा नहीं होता, टुटे मनसे कोई खडा नहीं होता. हरामखोर भाजपवाले आमचे गिरनेचं पाणी आम्हाला देत नाहीत ते आता अटलजींना पण विसरले”, असा घणाघात उन्मेष पाटील यांनी केला.