⁠ 
शनिवार, मे 4, 2024

जळगावात भाजपला मोठा धक्का ! अखेर उन्मेष पाटीलांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२४ । जळगाव जिल्ह्यातील राजकारणात मोठा भूकंप घडला आहे. उन्मेष पाटील यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे.

काही वेळापूर्वी उन्मेष पाटील यांनी आपला खासदार पदाचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे फॅक्स केला. यानंतर उन्मेष पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मातोश्री निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

सत्ताधारी भाजपच्या विद्यमान खासदाराने महाराष्ट्रात पक्षांतर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार असलेल्या उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं. त्यामुळे उन्मेष पाटील प्रचंड नाराज झाले होते. या नाराजीतूनच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला.

मध्यंतरी त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली अन् आज अखेर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते. त्यांच्या समर्थकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली. उन्मेष पाटील यांच्या प्रवेशामुळे जळगावात ठाकरे गट अधिक मजबूत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

तर लाचार होऊन राजकारण करणं योग्य नाही ; उन्मेष पाटील
ही पदाची, जय-विजयाची लढाई नाही तर ही स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची लढाई आहे. खानदेशाच्या विकासाच्या बाजूने पुढे नेणार लढाई आहे, ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या उन्मेष पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. मला उमेदवारी मिळालेली नाही म्हणून ही भूमिका घेतलेली नाही. पण राजकारणात काम करताना मान सन्मान नको, पद नको, पण त्याचा स्वाभिमान सांभाळला जात नसेल अवहेलन केली जात असेल तर लाचार होऊन राजकारण करणं योग्य नाही. भाजपमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली नाही, अवहेलना होत असल्यानं वेगळी भूमिका घेतली असे उन्मेष पाटील यांनी स्पष्ट केले. आम्ही सकारात्मक राजकारण करू असेही ते म्हणाले.