अज्ञात चोरट्यांनी घरातून २५ हजार लंपास
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील मोहराळा येथील एक व्यक्तीने घर बांधण्यासाठी बँकेतून कर्जरूपाने २५ हजार रुपये काढून आणले. अज्ञात चोरट्यांनी लांबवले. ही घटना गुरुवारी उघडकीस आल्याने या घटनेप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
मोहराळा येथील संजय अडकमोल यांनी याबाबत फिर्याद दिली. घराचे बांधकाम करण्याकरिता त्यांनी नुकतेच मोहराळा येथील बँकेतून २५ हजार रुपयांचे कर्ज काढून ते पैसे घरातील कपाटात ठेवले होते. गुरुवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत जाण्यासाठी ते कुटुंबीयांसह सायंकाळी ७ वाजता घराला कुलूप लावून गेले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी रोकड रक्कम चोरून नेली. हा प्रकार रात्री १०.३० वाजता अडकमाेल घरी परतल्यावर त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी शुक्रवारी सकाळी यावल पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी किरण खैरे मोहराळा या संशयितास ताब्यात घेतले आहे.