जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२३ । यात्रा पाहण्यासाठी जाणार्या धुळे तालुक्यातील तरुणीचा रीक्षा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले आहेत. अश्विनी गुलाब भामरे (21, मेहेरगाव) असे मयत तरुणीचे नाव असून अलीकडेच गत महिन्यात अश्विनीचा विवाह निश्चित झाला होता. मात्र लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच कु्रर नियतीने तरुणीवर घाला घातला.
धुळे जिल्ह्यातील मेहरगाव येथील रहिवासी अश्विनी गुलाब भामरे (21) ही तरुणी अमळनेर येथील यात्रा पाहण्यासाठी शनिवार, 13 एप्रिल रोजी मेहरगाव येथून अमळनेर तालुक्यातील खेडी खुर्द प्र.ज. येथे राहणार्या तिच्या मोठ्या बहिणीसह मेहुण्यांकडे आली होती.
रात्री यात्रेत जायचे ठरल्याने त्यानुसार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अश्विनी ही तिच्या बहिणीची सासू, बहिणीची नणंद या दोघांसोबत रीक्षा (एम.एच.19 बी.जे.8996) तून अमळनेरकडे निघाल्यानंतर मेहेरगाव फाट्याजवळ टाटा मॅजिक (एम.एच.19 बी.जे.1405) या क्रमाकांच्या टाटा मॅजीक या भरधाव वाहनाने क्षहक्षाला जोरदार धडक दिल्याने अश्विनी हिच्या डोक्याची कवटी फुटताच तिचा मृत्यू झाला.
रीक्षातील रेखाबाई पाटील आणि वर्षा हर्षल बोरसे हे दोन्ही जखमी झाले. रीक्षाच्या मागून दुचाकीवर येत असलेल्या मेव्हण्यांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले मात्र, रुग्णालयात अश्विनी हिला वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले.
अपघात प्रकरणी रविवारी दुपारी मयत अश्विनीचे मेहुणे निलेश प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरुन (एम.एच.19 बी.जे.1405) या क्रमाकांच्या वाहनावरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील हे करत आहेत.