जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । भडगाव तालुक्यातील भातखंडे येथील जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील (वय ३९) यांचे काल रेल्वे प्रवासात निधन झाले. मुंबईहून भातखंडे येथे आज त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी भातखंडे येथे येईल नंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील हे आपल्या सहकार्यांसोबत बिकानेर येथून त्रिपुरा येथे रेल्वेने जात असताना, प्रवासात त्यांना भोवळ आली. दि. ४ रोजी बिकानेरहून पूर्ण युनिटसोबत ते त्रिपुरा येथे जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होते. प्रवासात त्यांना अचानक भोवळ आली. दरम्यान गोरखपूर येथे रेल्वे थांबवून त्यांना सहकारी व अधिकार्यांनी उपचारासाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे उपचारादरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
सैन्य दलातील जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील हे मार्च २००३ मध्ये नाशिक या ठिकाणी भरती झाले होते. ते ३०५ फिल्ड रेजिमेंट मध्ये देशसेवा गेल्या २० वर्षापासून बजावत होते. त्यांचे ट्रेनिंग हैदराबाद व बंगलोर या ठिकाणी झाले असून ते मेस कुक या पदावर कार्यरत होते आता ते ऑफिसर्स स्पेशल कुक होते. त्यांनी सिक्कीम, जम्मू, बिकानेर, लेह, लडाख या ठिकाणी सेवा बजावली आहे. कर्तव्य बजावण्यासाठी बिकानेर येथून आगरताळा या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झालेली होती. पोस्टिंगवर जात असताना प्रवासादरम्यान ही घटना घडली असून त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी इलाहाबाद येथील लष्करी इस्पितळात नेले आहे. तेथुन त्यांचे पार्थिव वाराणसी होऊन मुंबईपर्यंत विमानाने येणार आहे.
मुंबईहून भातखंडे येथे आज त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी भातखंडे येथे येईल नंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शहीद जवान दत्तात्रय पाटील हे अत्यंत शांत व संयमी सोज्वळ स्वभावाचा व मनमिळाऊ होता ते भातखंडे येथील विठ्ठल राजधर पाटील यांचे पुत्र असून त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुली, १ लहान भाऊ, १ बहीण असा परिवार आहे.
दरम्यान भडगाव येथिल तहशिलदार मुकेश हिवाळे, पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, एपीआय चद्रंसेन पालकर, पोलीस काॕस्टेबल स्वप्नील पाटील, विलास पाटील यांनी प्रशासनाच्यावतीने शहिद जवान दत्तात्रय पाटील यांच्या भांतखडे निवासस्थानी भेट देवुन त्याच्या परीवाराचे सांत्वन केले. तसेच त्याच्या अंतिम संस्कार बाबत माहिती घेऊन पहाणी केली. शहिद जवान दत्तात्रय पाटील यांच्यावर आज दुपारी ३ वाजता अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती दिली.