दुर्दैवी : गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । तालुक्यातील शिरसोली येथील धारागिर शिवारात असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांपैकी दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडून हळहळ व्यक्त होत आहे.
निलेश राजेंद्र मिस्त्री (वय १७ ) आणि सूर्यवंशी शिवाजी पाटील (वय १५ ) दोन्ही रा. भोलानाथ नगर, शिरसोली असे मयत झालेल्या शाळकरी मुलांचे नाव आहे. तर या घटनेत ९ वीत शिक्षण घेणारा जय जालिंदर सोनवणे यातून बचावला आहे. दरम्यान, दोघा शाळकरी मुलांचे मृतदेह एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने काढले असून या ठिकाणी पोलीस पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ यांनी गर्दी केली होती. दरम्यान दोन्ही मुलांचे मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे.
निलेश राजेंद्र मिस्त्री, सूर्यवंशी शिवाजी पाटील व जय जालिंदर सोनवणे हे तिघे मित्र शिरसोली येथील भोलानाथ नगरातील रहिवाशी असून ते तलावात पोहण्यासाठी आज दुपारी धारागिरी शिवारात असलेल्या तलावात गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने वरील दोघांचा यात बुडून मृत्यू झाला. तर तिसरा मित्र हा या अपघातात वाचला आहे. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचारी आणि पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेऊन विलास भिल्ल ,हिरामण प्रताप भिल्ल, संदीप भिल, या तिघांनी त्या दोन मृत मुलांचे मृतदेह बाहेर काढले. यावेळी घटनास्थळी दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केल्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले.