दुर्दैवी : प्रसूती झालेल्या कन्येला डबा देण्यापूर्वीच पित्यावर काळाचा घाला!
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । ग्रामीण रुग्णालयात प्रस्तुती झालेल्या कन्येचा डबा घेऊन भालगाव येथून राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ ने एरंडोल कडे पायी येत असताना सुनील भास्कर शिंदे वय ४४ वर्ष. याला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला ही घटना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास धारागीर गावा नजीक घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एरंडोल तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी सुनील भास्कर शिंदे याच्या मुलीची एरंडोल ग्रामीण रुग्णालयात प्रसुती झाली. त्यानंतर सुनील हा भालगाव येथून डबा घेऊन पायी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाने एरंडोल कडे निघाला. वाटेत धारागीर गावाजवळ एका अज्ञात वाहनाने त्याला उडवले.
या अपघाताबाबत माहिती मिळताच एरंडोल पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार विकास देशमुख, पंकज पाटील, अनिल पाटील, वाल्मीक ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली व छिन्नविछिन्न अवस्थेत असलेला सुनील चा मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. नेमक्या त्याच ठिकाणी मृताची कन्या प्रसुतीसाठी दाखल झाली होती. याबाबत तिला माहिती मिळाल्यावर तिने एकच हंबरडा फोडला. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दुर्घटनेचे वृत्त समजताच हळहळ व्यक्त करण्यात आली येत आहे. सुनील हा शेतमजूर असून त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. घरची परिस्थिती हालाखीची असून कुटुंबप्रमुख सुनील शिंदे याचे अपघाती निधन झाल्याने त्याचा परिवार निराधार झाला आहे. त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्थांनी पुढे यावे असे आवाहन केले जात आहे.