जळगावातील बेरोजगार तरुणांनो..उद्योजक बनण्यासाठी ‘या’ योजनेतंर्गत मिळेल कर्ज, तुम्ही आहात का पात्र?

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२३ । अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. मुंबई या कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरावर मराठा व ब्राम्हण समाजातील बेरोजगार तरुणांना उद्योजक बनण्यासाठी महामंडळामार्फत विविध योजनेतंर्गत लाभार्थी स्तरावर कर्ज देण्यात येते. कर्ज प्रकरण हे राष्ट्रीयकृत बैंक/ सहकारी बैंक मार्फत मंजूर केलेल्या रक्कमेवर व्याजाचा परतावा महामंडळामार्फत कर्जदार लाभार्थ्यास देण्यात येतो.

वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना :-
या योजनेची मर्यादा रु.10 लाखहून रु.15 लाखापर्यंत वाढविण्यात आलेली असून सदरचा कालावधी जास्तीत जास्त 7 वर्ष व व्याजाचा दर द.सा.द.शे. 12% प्रमाणे महामंडळामार्फत रू.4.5 लाखाचा व्याज परतावा मिळतो.

गट कर्ज व्याज परतावा योजना – दोन किंवा दोन पेक्षा जास्त गटाने एकत्र येवून 10 ते 15 लाखाच्या मर्यादेत व 5 पेक्षा जास्त व्यक्ती असल्यास व्यवसाय व उद्योग कर्जावरील 5 वर्षांपर्यंत अथवा कर्ज कालावधी जे कमी असेल ते जास्तीत जास्त 12% किंवा 15 लाखाच्या मर्यादित कर्ज मंजुर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

गट प्रकल्प कर्ज योजना :- या योजनेमध्ये FPO गटांनी त्यांच्या शेतीपुरक व्यवसाय करीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील देखील व्याजपरतावा नियमानुसार महामंडळ करते.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी महामंडळाच्या या संकेतस्थळावर www.mahaswayam.gov.in ऑनलाईन अर्ज करावेत. तसेच या योजनेबाबत काही अडचण असल्यास महामंडळाचे जिल्हा समन्वयक दिपक बोरसे यांच्याशी कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 या वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन वि. जा. मुकणे, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.