जळगाव लाईव्ह न्यूज| ७ ऑगस्ट २०२३। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात उभय नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येतंय.
राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंची जुनी भाषणं संग्रहित केलेली आहेत. १९९० पूर्वी जेव्हा अपुरी साधणं उपलब्ध होती, तेव्हा त्यांनी ग्रामोफोनमध्ये बाळासाहेबांची भाषणं रेकॉर्ड केली होती. ती भाषणं राज ठाकरेंकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी या भाषणांची उद्धव ठाकरेंना आवश्यकता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे राज यांच्याशी फोनवरुन संवाद साधणार असल्याचं सांगितलं जातंय. याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
बाळासाहेबांवरील चर्चेच्या निमित्ताने दोन्ही नेते आपसात बोलणार आहेत. असं असलं तरी राजकीयदृष्ट्या दोन्ही भाऊ एकत्र येणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मागच्याच महिन्यात राज आणि उद्धव एकत्र येणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. शेवटी राज ठाकरेंनी सर्व शक्यता फेटाळून लावल्या होत्या.