जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२४ । विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये मित्र पक्षांकडून काही जागांवरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. अशामध्ये आता महाविकास आघाडीमधून मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वच जागांसाठी ठाकरे गटाने तयारी केली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून यासाठी राज्यातील महायुतीमधील भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर अजित पवार गट आणि शिंदे गटाकडून देखील लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू असल्याची चर्चा होत आहे. महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये विदर्भ, नागपूर आणि सांगोल्याच्या जागेवरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत.
या वादामुळे आता शिवसेना ठाकरे गटाने सर्वच जागा लढवण्याची तयारी केली आहे. विधानसभेच्या सर्वच जागांसाठी ठाकरे गटाने बैठका करून आपली तयारी केल्याची सूत्रांची माहिती आहे. जागावाटपावरून काँग्रेससोबत वैचारिक मतभेद असल्यामुळे ठाकरे गटाचा प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार आहे. आले तर सोबत नाहीतर शिवाय असं विधानसभेला आक्रमक रित्या सामोरे जाण्याची ठाकरे गटाची रणनीती आहे.तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेमुळे काँग्रेसनेही स्वबळाची तयारी सुरु केलीची माहिती समोर आली आहे.