⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

त्यावेळी ठाकरे मुख्यमंत्रीपद सोडून भाजपसोबत यायलाही तयार होते, पण..; केसरकरांचा गौप्यस्फोट

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार येऊन एक महिन्यापेक्षा जास्तचा काळ झाला आहे, पण राज्यात अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. विरोधकांनी यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. दरम्यान आज शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरयांनी पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले आहेत.

 यावेळी या पत्रकार परिषदेत केसरकरांनी नारायण राणे यांचाही समाचार घेतला. सुशांतसिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केली गेली. यात नारायण राणेंचाही सहभाग होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही वस्तुस्थिती घालून राणे काय बोलतायत हे सांगण्यात आलं होतं. त्यांनीही प्रतिसाद दिला. त्यानंतर मोदी व ठाकरे यांच्यात संवाद सुरू झाला. नंतर त्यांची भेट झाली होती.

या सगळ्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपद सोडून भाजपसोबत यायलाही तयार झाले होते. मात्र, नारायण राणे (Narayan Rane) यांच्या केंद्रीय मंत्रिमडळातील समावेशामुळे ऐनवेळी ही बोलणी फिस्कटली, असा दावा एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना स्पष्ट सांगितलं होतं की, ‘मी पदापेक्षा तुमच्याशी असलेले कौटुंबिक संबंध जपण्याला जास्त महत्त्व देतो’. त्यानंतर उद्धव ठाकरे १५ दिवसांत आपल्या पदाचा त्याग करणार होते. पण ते जेव्हा मुंबईला परत आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, आपण या गोष्टी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. नाहीतर कार्यकर्त्यांचा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काहीवेळ मागून घेतला होता. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडून त्यांना हा वेळ देण्यात आल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.