नागपूर-मुंबईदरम्यान भुसावळ विभागातून धावणार ‘या’ दोन गाड्या
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । उन्हाळ्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान २ अतिजलद विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेगाडी क्रमांक ०११०२ मुंबई-नागपूर अतिजलद विशेष रेल्वेगाडी ३ एप्रिलला सायंकाळी ५.४० वाजता सुटून नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे थांबा देण्यात आला आहे.
या गाडीत तीन द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ५ स्लीपर आणि ७ सामान्य द्वितीय श्रेणी कोच राहणार आहेत. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाडीचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
गोरखपूरदरम्यान १८२ उन्हाळी विशेष गाड्या
या व्यतिरिक्त गोरखपूरदरम्यान १८२ उन्हाळी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई-बलिया त्रै-साप्ताहिक विशेष ७८ फेऱ्या होणार आहेत. ०१०२५ विशेष गाडी १ एप्रिल ते २९ जूनपर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि बलिया येथे तिसऱ्या दिवशी पोहोचणार आहे.०१०२६ विशेष गाडी ३ एप्रिल ते १ जुलैपर्यंत दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी बलिया येथून दुपारी ३.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी पोहोचणार आहे.
मुंबई-गोरखपूर आठवड्यातून ४ वेळा विशेष १०४ फेऱ्या धावणार आहे. यामध्ये ०१०२७ विशेष गाडी आठवड्यातून ४ वेळा २ एप्रिल ते ३० जून पर्यंत दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी पोहोचणार आहे. तर ०१०२८ विशेष गाडी आठवड्यातून ४ वेळा ४ एप्रिल ते २ जुलैपर्यंत दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी गोरखपूर येथून २.२५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी पोहोचणार आहे.