जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ज्यात गुरे चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या चार जणांपैकी इतर दोन संशयित आरोपी पोलिसांच्या वाहनातून बेड्यांसह फरार झाल्याची घटना समोर आलीय. शाकीर शाह अरमान शाह (वय ३०, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) आणि अमजद शेख फकीर कुरेशी (वय ३५, रा. मेहरुण) असं फरार झालेल्या संशयित आरोपींचे नाव असून या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून फरार झालेल्या आरोपीचा शोध सुरु आहे.

नेमकी घटना काय?
अमळनेर तालुक्यातील लोणे आणि पिंपळे गावांमधून सात गुरे चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी करत होते. तपासादरम्यान जवखेडे येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एमएच-१९ बीबी ५१९८ या क्रमांकाची दुचाकी चोरीच्या ठिकाणी दिसून आली.

दुचाकीच्या मालकाचा शोध घेतल्यावर अकील कादिर पिंजारी (रा. आझाद नगर, पिंप्राळा, जळगाव) असे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला बुधवार ( दि. 22 ) रोजी दुपारी दोन वाजता ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान अकील पिंजारी याने त्याचे साथीदार शाकीर शाह, अरमान शाह, अमजद शेख फकीर कुरेशी, आफताब आलम शेख रहीम (रा. नशिराबाद) आणि तौसिफ शेख नबी (रा. फातिमा नगर, जळगाव) यांची नावे सहआरोपी असल्याचे सांगितले आहे.
या टोळीने अमळनेर तालुक्यात सात आणि पहुर परिसरात तीन गुरे चोरी केल्याची कबुली दिली. चोरीसाठी त्यांनी पिकअप वाहन (एमएच-१९ सीव्ही-७१६९) वापरल्याचेही उघड झाले. त्यापैकी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर तौसिफ शेख नबी हा पसार होता.रात्री स्पॉट व्हेरिफिकेशनसाठी आरोपींना शासकीय वाहनाने अमळनेर येथे आणत असताना, शाकीर शाह, अरमान शाह आणि अमजद शेख, फकीर कुरेशी या दोघांना बेड्या घालून मागच्या सीटवर बसवले होते. मात्र पोलीसांचे वाहन कुऱ्हे रेल्वे अंडरपासजवळ पोहोचल्यावर दोघांनी संधी साधून पळ काढला.
पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली, मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत शेतात लपल्याने त्यांचा शोध अद्यापही लागलेला नाही. उर्वरित दोन आरोपींना अमळनेर पोलिस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले आहे. फरार झालेल्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत.







