⁠ 
शनिवार, मे 4, 2024

जळगावातील दोघे पोलीस कर्मचारी निलंबित ; नेमकं प्रकरण काय?

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२४ । बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्यावर पैसे देण्यास नकार दिल्याने दोन पोलिसांनी वाळू वाहतुकदारास बेदम मारहाण करून बोट फ्रैक्चर केले होते. या घटनेत डीवायएसपी कार्यालयातील सचिन साळुंखे व शनिपेठ पोलिस ठाण्यातील राहुल पाटील यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले असून, दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

रविवारी (ता. १७) रात्री साडेबाराच्या सुमारा बिलवाडी फाटा ते वावडदा गावादरम्यान पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीसारखीच दिसणारी पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या दोघी पोलिसांनी वाळू व्यवसायिक राकेश पाटील यांचे ट्रॅक्टर अडवून पैशांची मागणी केली. आताच पैसे आणून दे, असा हट्ट धरल्याने बाचाबाची होवून वाद उफाळला. दोघी पोलिसांनी सरकारी दांडक्याने राकेश पाटील यांना अंगावर वळ उमटतील, अशा पद्धतीने बेदम मारहाण केली.

या मारहाणीत त्यांचा बोट फॅक्चर झाला असून, त्याने तक्रार देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांतील कलेक्टर टोळीने ही तक्रार होऊ दिली नाही. मात्र, घटनेची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यापर्यंत पोहोचली. चौकशी अंती प्रकरणात सत्यता आढळून आल्याने सोमवारी (ता. २२) डॉ. रेड्डी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी राहुल पाटील व डीवायएसपी कार्यालयातील सचिन साळुंखे यांच्या निलंबनाचे आदेश पारित केले.