जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील एका २७ वर्षीय तरुणाने काैटुंबीक वादातून आपला ६ वर्षाचा मुलगा अन् ४ वर्षाच्या मुलीसह नगरदेवळा रेल्वे स्थानकावर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना १३ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता घडली हाेती. या प्रकरणी मृताच्या पत्नीसह तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा २ राेजी येथील ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे. जाधव यांनी आपल्या ६ वर्षाचा मुलगा चिराग आणि ४ वर्षाच्या खुशी नावाच्या मुलीसह नगरदेवळा रेल्वे स्थानकावर धावत्या सचखंड एक्स्प्रेसखाली उडी घेत आत्महत्या केली हाेती. पती-पत्नीत गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती तर पती दोन्ही मुलांसह आपल्या मूळ गावी बाेरखेडा येथे आला होता. तसेच पत्नीने पतीविरुद्ध पोलिसांतही घटना घडली त्या दिवशी तक्रार ही केली होती. या वादातून अखेर जितेंद्रने दोन्ही मुलांसह आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेत १३ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता आपली जीवनयात्रा संपवली हाेती. दरम्यान, या घटनेमुळे सर्वांचेच मन सुन्न झाले हाेते.
या प्रकरणी जितेंद्रचे वडील दिलीप देवराम जाधव यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलिस अधीक्षकांनी हा गुन्हा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर शनिवारी गुन्हा दाखल केला. संशयितांनी जितेंद्रला मारहाण करत अपमानीत करून त्याला व मुलगा चिराग व मुलगी खुशी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मृत जितेंद्रच्या वडिलांनी पोलिसांकडे दिली आहे. त्यानुसार मृताची पत्नी पूजा जितेंद्र जाधव, ईश्वर जिभाऊ जगताप (दोन्ही रा. डोणदिगर) व एक अनोळखी व्यक्ती अशा तिघांविरोधात कलम ३०६, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास एपीआय रमेश चव्हाण करत आहेत.