जळगावकरांसाठी आनंदवार्ता ! पुणे, मुंबईसाठी उद्या दोन नव्या ‘अमृत भारत एक्सप्रेस’चे लोकार्पण, पहा वेळापत्रक..?

एप्रिल 27, 2026 2:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ आणि जळगावातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या म्हणजेच २८ एप्रिल रोजी दोन नवीन ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही गाड्यांना रेल्वेचे केंद्रस्थान असलेल्या भुसावळ जंक्शनवर थांबा देण्यात आला असून, यामुळे उत्तर भारतातील धार्मिक स्थळांकडे जाणारा प्रवास आता अधिक जलद आणि किफायतशीर होणार आहे.

pune varanasi amritbharat

रेल्वेच्या माहितीनुसार, या दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस सेवा वाराणसी-हडपसर (पुणे) आणि अयोध्या कॅन्ट-लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) दरम्यान धावतील. उत्तर भारतातील बनारस आणि अयोध्या यांसारख्या प्रमुख धार्मिक शहरांशी जळगाव आणि भुसावळ थेट जोडले जाणार असल्याने भाविक आणि व्यावसायिकांची मोठी सोय झाली आहे.

वाराणसी-हडपसर (पुणे) अमृत भारत एक्सप्रेस

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने नवीन बनारस-हडपसर-बनारस अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे; या सेवेचा पहिला प्रवास उद्या २८ एप्रिल २०२६ रोजी बनारस येथून सुरू होईल. आपल्या पहिल्या प्रवासात, बनारस-हडपसर अमृत भारत एक्सप्रेस गाडी क्रमांक ०२५३१ म्हणून धावेल. ही गाडी वाराणसी येथून दुपारी ४:४५ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी ३:०० वाजता भुसावळ आणि ३:३५ वाजता जळगावला पोहोचेल. त्यानंतर रात्री १२:५५ वाजता हडपसर (पुणे) येथे पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा?

या गाडीला ग्यानपूर रोड, प्रयागराज, फतेहपूर, गोविंदपुरी, ओराई, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, बिना, राणी कमलापती, नर्मदापुरम, इटारसी, हरदा, खांडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड स्थानकांवर थांबा असेल.या ट्रेनमध्ये एकूण २२ डबे असतील, ज्यामध्ये ८ स्लीपर क्लास, ११ जनरल डबे, २ एसएलआर डबे आणि १ पॅन्ट्री कार यांचा समावेश आहे.

अयोध्या कॅन्ट-लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई)

रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि अयोध्या कॅन्ट दरम्यान नवीन अमृत भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक २२१११/२२११२) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेचे उद्घाटन २८ एप्रिल २०२६ रोजी अयोध्या कॅन्ट स्थानकावरून केले जाईल. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणाऱ्या भाविकांची या गाडीमुळे मोठी सोय होणार आहे.आपल्या पहिल्या प्रवासात, अयोध्या कॅन्ट-एलटीटी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन क्रमांक ०२२१२ म्हणून धावेल. ती अयोध्या कॅन्ट येथून सायंकाळी ४:४५ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी १२:३५ वाजता भुसावळ आणि १:१५ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचेल. रात्री ९:०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई)ला पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा?

या गाडीला सुलतानपूर, माँ बेल्हा देवी धाम प्रतापगड, प्रयागराज, माणिकपूर, सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ, जळगाव, नाशिकरोड, कल्याण आणि ठाणे ही स्थानके आहेत.या ट्रेनमध्ये २२ डबे असतील, ज्यात ८ स्लीपर क्लास, ११ जनरल क्लास, २ एसएलआर डबे आणि १ पॅन्ट्री कार यांचा समावेश आहे.

भाविकांची होणार मोठी सोय:
बनारस आणि अयोध्या ही हिंदू धर्मातील प्रमुख तीर्थक्षेत्रे आता भुसावळ आणि जळगावशी थेट जोडली गेल्यामुळे भाविकांची मोठी सोय झाली आहे. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता, या दोन गाड्यांमुळे नियमित गाड्यांवरील भार कमी होईल आणि प्रवाशांना कमी खर्चात सुखकर प्रवास करता येईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now