यावल तालुक्यात एकाच क्रमांकाचे दोन डंपर जप्त ; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२३ । यावल तालुक्यातील कासवा शिव रस्त्याने एका बंद स्टोन क्रशरजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे एकाच क्रमांकाचे दोन डम्पर महसूल आणि पोलिसांनी जप्त केल्याची कारवाई केली. दोन डम्पर तापी नदीतून वाळू उपसा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येत असल्याचा संशय आहे. याप्रकरणी मंडळ अधिकारी यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही डम्पर पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावल तालुक्यात महसुल प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी विनापरवाना गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. महसुलच्या या कारवाईमुळे वाळु माफियाचे चांगलेच धाबे दणाणले आहे. यातच तालुक्यातील कासवा येथील गट क्रमांक ८ मध्ये बंद स्टोन क्रशर आहे. या ठिकाणी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, फैजपूरचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ, मंडळाधिकारी बबिता चौधरी, तलाठी एस. व्ही. सूर्यवंशी यांच्या पथकाला अवैधरीत्या तापी नदीतून वाळू वाहतूक करण्याकरिता दोन डम्पर दिसून आले.

दोन समान क्रमांक असलेले सदरचे दोघ ही डंपर पुढील कार्यवाहीसाठी जमा करण्यात आलेले आहेत. तसेच कासवे येथील तापी नदी पात्रा जवळ१० ब्रास वाळुचा साठा देखील जप्त करून फैजपुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन यावल येथील तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला आहे.

यावल मागील काळात महसुल प्रशासना च्या वतीने कारवाई करीत अवैद्य गौणखनिज ची विनापरवाना वाहतुक करणार्‍या वाहनांवर जप्तीची कार्यवाही करण्यात आली असुन असे वाहनांच्या मालकांनी अद्यापपावेतो आकारण्यात येणारी दंडाची रक्कम भरलेली नाही अशा वाहनांच्या लिलाव करण्याबाबत चा प्रस्ताव प्रांत अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतले जाणार असल्याचे महसुल प्रशासनाच्या सुत्रांकड्डन कळविण्यात आले आहे.