जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांची मालिका सुरूच असून अशातच आता चोपडा तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. ही घटना चोपडा-यावल रस्त्यावर सोमवारी सायंकाळी टेमऱ्या उर्फ रगन जगन बारेला (१८) व मगन जगन बारेला (वय ३०) रा. वर्डी असे मृतांची नावे आहेत.

काय आहे घटना?
या घटनेबाबत असे की, मृत दोघे भाऊ चोपड्याहून नवा मोबाइल घेऊन दुचाकी ( क्र. एमएच १९ एव्ही ८५८२) ने घरी जात होते. याच दरम्यान, माचला फाट्याच्या पुढे अडावदकडून चोपड्याकडे भरधाव वेगात येणाऱ्या क्रेटा कार (क्र. एमएच ०४ एचएफ ८२९६) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने दोघा सख्या भावांचा जागीच मृत्यु झाला. कारची धडक एव्हढी जबर होती की दुचाकी रस्त्यावरून शेताच्या बांधावर उडाली होती. .

अपघातातील मृत टेमऱ्या बारेला याचा एक महिन्यापूर्वी साखरपुडा झाला होता. येणाऱ्या दिवाळीत त्याचे लग्न होते. बोहल्यावर चढण्यापूर्वी त्याचा मृत्यु झाला. दोन्ही कमवत्या मुलांचा मृत्यू झाल्याने आमचं काहीच उरले नाही असा आक्रोश त्यांच्या कुटुंबांकडून सुरू होता. मोठा मुलगा मगन हा विवाहित असून त्याला पत्नी, चार मुली आणि एक मुलगाव आई-वडील असा परिवार होता.










