जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२३ । पाचोरा तालुक्यातील पुनगाव शिवारातुन एका गावठी कट्ट्यासह दोन जणांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून साहित्य जप्त करण्यात आले आहे. राहुल अनिल परदेशी (वय – २७) व रामचंद्र गोपीचंद परदेशी (वय – ३७) असं अटक केलेल्या दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
काय आहे प्रकार?
तालुक्यातील पुनगाव येथे एका इसमाजवळ गावठी बनावटीचे पिस्टल असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी तात्काळ पथक तयार करत घटनास्थळी रवाना केले. पुनगाव शिवारात दोन इसम फिरत असल्याचे निदर्शनास येताच पथकाने सापळा रचत दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. याप्रसंगी त्यांची झडती घेतली असता त्यातील राहुल परदेशी याचेजवळ गावठी बनावटीचे पिस्टल आढळुन आले. दरम्यान पथकाने त्यांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांना ताब्यात घेवुन पोलिस स्टेशन मध्ये आणले.
दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश शिवदे यांच्या फिर्यादीवरून २० हजार रुपये किंमतीचे एक काळ्या रंगाचे त्यावर काळे हॅण्डग्रीप असलेले गावठी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) त्यास ट्रिगर दबलेले व रिकामी तसेच विना स्प्रिंगची मॅगझिन तिची मागील पट्टी निघालेले असे शस्त्र अनाधिकृतपणे बाळगल्याने दोघांविरूद्ध भाग – ६ गु. र. नं. ३४७ / २०२३ भारतीय हत्यार कलम ३ / २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.