जळगाव लाईव्ह न्यूज। २६ जुलै २०२३। फेसबुक फ्रेंडच्या भेटीसाठी पाकिस्तानला गेलेल्या राजस्थानच्या अंजूची सर्वत्र चर्चा आहे. पाकिस्तानी तरुणी सीमा हैदरचं प्रकरण गाजत असताना अशातच अंजूनं ‘सीमा’ ओलांडली. ती थेट पाकिस्तानला पोहोचली. प्रियकरासाठी अंजू पाकिस्तानला गेल्याची बातमी सर्वप्रथम आली. मात्र अंजूनं त्यावर स्पष्टीकरण दिलं. मी सीमा हैदरसारखी नाही. पाकिस्तानमध्ये एका लग्न सोहळ्यासाठी आले असून पुढच्या काही दिवसांमध्येच भारतात परतेन, असं तिनं सांगितलं. प्रियकराकडे नव्हे, तर मित्राकडे आल्याचा दावा तिनं केला आहे. मात्र या घडामोडींमध्ये आता वेगळाच ट्विस्ट आला आहे.
अंजूचा मित्र सातत्यानं वेगवेगळी माहिती देत आहे. आम्ही साखरपुडा करणार असल्याचं त्यानं सुरुवातीला म्हटलं. त्यानंतर त्यानं लव्ह स्टोरीचा अँगलच नाकारला. आता त्याचा सूर पुन्हा बदलला आहे. अंजूची इच्छा असल्यास मी लग्नास तयार आहे, असा पवित्रा अंजूचा मित्र असलेल्या नसरुल्लानं घेतला आहे. तो खैबर पख्तुनख्वाच्या अपर दीर जिल्ह्याचा रहिवासी आहे. पाकिस्तानात लग्न सोहळ्यासाठी आली आहे. काही दिवस इथे फिरुन मग भारतात परतणार आहे, असं अंजूनं कालच सांगितलं होतं.
अंजूचा व्हिसा २० ऑगस्टला संपणार आहे. अंजूचा मित्र नसरुल्लाहनं याने अनेक गोष्टींचा उलगडा केला. “अंजूसोबत २०१९ मध्ये फेसुबकच्या माध्यमातून ओळख झाली. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. मी अंजूवर प्रेम करतो. तिच्याशी लग्न करु इच्छितो. मी अंजूसाठी भारतात येण्यास तयार आहे. पण लग्न अंजूच्या इच्छेवर अवलंबून आहे. तिची इच्छा नसेल तर लग्न होणार नाही. मला त्यावर कोणताच आक्षेप नसेल,” असं नसरुल्लाह म्हणाला.
अंजूला पाकिस्तान अतिशय आवडला आहे. मी अंजूला अनेक ठिकाणी फिरायला घेऊन गेलो. ती इथे पूर्णपणे सुरक्षित आहे. पोलिसांनीदेखील तिला सुरक्षा पुरवली आहे, असं नसरुल्लाहनं सांगितलं. “अंजू विवाहित आहे. तिला दोन मुलं आहेत. मला या सगळ्याची कल्पना आहे. मात्र माझा कोणताही आक्षेप नाही. मी त्यांना स्वीकारण्यास तयार आहे. अंजूच्या इच्छेनुसार सगळं होईल. अंजूची इच्छा असेल तिथे मी राहीन. मग भारत असो वा पाकिस्तान,'” असं म्हणत नसरुल्लाहनं साखरपुड्याच्या वृत्ताचं खंडन केलं.