⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | पोलीस कवायत मैदानावर भरतीचा सराव केल्याने तरुणाला बेदम मारहाण

पोलीस कवायत मैदानावर भरतीचा सराव केल्याने तरुणाला बेदम मारहाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२२ । नववर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीला सुरुवात होणार असून त्यासाठी उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदानावर धावण्याचा सराव करीत असलेल्या तरुणाला तिघांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलीस कवायत मैदानावर सराव करीत असल्याने ही मारहाण केल्याचा आरोप जखमी तरुणाने केला आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची भरती प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांचे अर्ज भरले जाऊन मैदानी चाचणीसाठी त्यांना प्रवेश पत्र मेल केले जात आहे. दोन जानेवारीपासून राज्यभरात विविध ठिकाणी मैदानी चाचणीला सुरुवात होणार असून त्यासाठी उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. शहरातील विविध मैदानांवर आणि पोलीस कवायत मैदानावर देखील उमेदवार पोलीस भरतीचा सराव करीत असतात.

शहरातील जानकी नगरातील रहिवासी असलेला तुषार हिरामण सोनवणे वय-२४ हा खो-खो खेळातील राष्ट्रीय खेळाडू असून तो देखील पोलीस भरतीची तयारी करीत आहे. शनिवारी दुपारी ४.३० वाजता तो पोलीस कवायत मैदानावर धावण्याचा सराव करण्यासाठी आला असता अविनाश पाटील नामक तरुणाने त्याला मज्जाव केला. मैदान आमच्यासाठी असून तू इथे धावायचे नाही असे त्याने सांगितले. तुषार सोनवणे याने विनंती करीत जाब विचारला असता अविनाशसह इतर दोघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

मारहाणीत तुषारचा दात तुटला असून चेहरा, पोट, छातीला मुक्कामार लागला आहे. पोलीस कवायत मैदानावर नेहमी विविध भागातील तरुण सरावासाठी येत असतात. पोलीस बॉईजच्या नावाखाली इतरांना मारहाण होत असल्याचा प्रकार निंदनीय असून पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारा असल्याची प्रतिक्रिया भरतीचा सर्व करणाऱ्या उमेदवारांमधून उमटली. याप्रकरणी जखमी तुषार सोनवणे याचा पोलिसांनी जबाब नोंदविला आहे.

author avatar
Tushar Bhambare