जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना दिसत असून याच दरम्यान, महामार्ग सहावर बायपासजवळील म्हसवे फाट्या जवळ भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने त्यात २१ वर्षीय पत्नी ठार तर पती जखमी झाले. रूपाली शुभम बोरसे असे मृत पत्नीचे नाव असून शुभम भाऊसाहेब बोरसे (वय २५) रा. उंदिरखेडे असे गंभीर जखमी पतीचे नाव आहे.

शुभम बोरसे व रूपाली बोरसे हे दांपत्य दुचाकी क्र. एमएच १९ सीके ६२५२ ने जळगावकडे कामानिमित्ताने जात असताना यावेळी महामार्ग क्रमांक सहाच्या बायपासवर म्हसवे फाट्याजवळ रस्ता ओलांडत असताना भरधाव जाणाऱ्या ट्रक क्र. एचआर ५८ एफ १३१३ वरील चालक वसीम इरफान राजपूत चौरादेव ता.जि.सहारनपुर उत्तर प्रदेश याने दांपत्यास जोरदार धडक दिली. त्यात रूपाली बोरसे यांना डोक्याला तोंडाला व कमरेस जबर मार लागून दुखापत झाली तर शुभम बोरसे यास पायाला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पती-पत्नीला रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले.

तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूपाली बोरसे यांना तपासून मृत घोषित केले. तर शुभम बोरसे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले. याबाबत पुरुषोत्तम बोरसे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या पुढील तपास डॉ. शरद पाटील हे करीत आहे.











