जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना वाढताना दिसत असून अशातच एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात अमळनेर तालुक्यातील गलवाडे प्रौढाचा मृत्यू झाला. ईश्वर आनंदा पाटील असं मृत व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे गलवाडे गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात ट्र्क चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत असे की, ईश्वर आनंदा पाटील हे दि २४ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास त्यांचे सहकारी समाधान भिकन पाटील यांच्यासोबत दुचाकीने (MH 19 ED 9559) गलवाडेकडून अमळनेरच्या दिशेने जात होते. यावेळी हॉटेल केसरीसमोर समोरून येणाऱ्या ट्रकने (RJ 14 GJ 9136) त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, ईश्वर पाटील यांचा जागीच अंत झाला, तर पाठीमागे बसलेले समाधान पाटील गंभीर जखमी झाले. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हरियाणाच्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताचे भाऊ विश्वास भगवान पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारवड पोलीस ठाण्यात ट्रक चालक रुस्तम जैनु (रा. हरियाणा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका चालकावर ठेवण्यात आला आहे. मारवड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मुकेश साळुंखे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









