जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२३ । देशातील बहुतांश लोक रेल्वेने प्रवास करत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. अशातच रेल्वे विभागाकडून पुन्हा एकदा प्रवाशांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वेने घेतलेल्या निर्णयानंतर रेल्वेच्या एसी थ्री (AC 3) इकॉनॉमी डब्यातून प्रवास करणे स्वस्त झाले आहे. रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार एसी डब्यांच्या भाड्याबाबत जुनी व्यवस्था पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर एसी ३ इकॉनॉमी कोचचे भाडे एसी ३ कोचपेक्षा कमी असेल. हा निर्णय आजपासून म्हणजेच २२ मार्चपासून लागू करण्यात आला आहे.
आधीच तिकीट बुकींग केलेल्या प्रवाशांनाही या सुविधेचा फायदा मिळणार आहे. ऑनलाईन किंवा तिकीट खिडकीवरून तिकीट घेतलेल्या प्रवाशांना पैसे परत केले जाणार आहेत.
आजपासून तुम्ही ट्रेनच्या एसी 3 इकॉनॉमी डब्यातून प्रवास केल्यास तुम्हाला थर्ड एसीच्या तुलनेत कमी पैसे मोजावे लागतील. रेल्वेने गेल्या वर्षी एक व्यावसायिक परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकानंतर एसी ३ कोच आणि एसी ३ इकॉनॉमी कोचचे भाडे समान करण्यात आले आहे.
ब्लँकेट आणि चादरींची सोय
यापूर्वी इकॉनॉमी कोचमधील प्रवाशांना ब्लँकेट आणि चादरी दिल्या जात नव्हत्या. मात्र गतवर्षीपासून इकॉनॉमी कोचचे भाडे वाढविल्यानंतर प्रवाशांना ब्लँकेट आणि चादरची सुविधा मिळू लागली. आता 21 मार्च रोजी एक परिपत्रक जारी करून रेल्वेने जुनी यंत्रणा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. AC 3 कोचमध्ये सीटची संख्या 72 आहे, तर AC 3 इकॉनॉमी कोचमध्ये बर्थची संख्या 80 आहे.
यामुळेच AC 3 इकॉनॉमी कोचचा बर्थ AC 3 कोचपेक्षा लहान असतो. वास्तविक, एसी कोचमध्ये प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने एसी 3 इकॉनॉमी कोच सुरू केला होता परंतु तिकिटाची किंमत त्यांच्या मार्गात येते. वास्तविक, AC 3 इकॉनॉमी कोचचे तिकीट सुरुवातीला AC 3 पेक्षा कमी होते. आता पुन्हा एकदा जुनी व्यवस्था पूर्ववत करण्यात आली आहे.