जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२४ । तक्रारदाराशी संगनमत करून विम्याच्या रकमेवर डल्ला मारण्याच्या उद्देशाने ट्रक चोरीचा खोटा गुन्हा दाखल करणे वरणगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी भरत चौधरी यांच्या अंगलट आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी भरत चौधरी यांची पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केली असून, याबाबतचे आदेश त्यांनी काढले आहे.
नेमकं प्रकरण काय?
वरणगाव येथील रहिवासी ट्रकचालक कर्जबाजारी झाला होता. तसेच ट्रकसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते देखील थकले होते. त्याने वरणगाव पोलिस ठाण्यात ट्रक चोरीस गेल्याची खोटी तक्रार दिली होती. त्यानुसार वरणगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चौधरी यांनी गुन्हा दाखल केला होता. या ट्रकचालकाने धुळे येथील एका भंगार व्यावसायिकाकडे नेऊन तो मोडला. त्यातून त्याला लाखो रुपये मिळाले होते. त्यानंतर चालकासह पोलिसांनी संगनमत करून त्या ट्रकचा इन्शुंरन्स देखील पास करून घेतला होता. त्यातून मिळालेले सात लाख रुपयांची रोकड दोघांची हडप केल्याची तक्रार पोलिस अधीक्षक यांच्याकडे दाखल झाली होती.
संबंधित ट्रकचालक याने यापुपूर्वी देखील पोलिसात ट्रक चोरीचे बनावट गुन्हे दाखल केले आहे. त्याने पुन्हा पोलिस अधिकाऱ्याला हाताशी धरून बनावट गुन्हा दाखल केल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. त्यांनी हा प्रकार वरिष्ठांच्या लक्षात आणून देली. या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत संबंधित ट्रकचालकाला ताब्यात घेतले.
त्याला ‘खाकी’ हिसका दाखविताच त्याने संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून ट्रक चोरीचा खोटा गुन्हा दाखल केल्याची कबुली त्याने दिली. संपूर्ण घटना समोर आल्यानंतर या प्रकाराची तत्काळ दखल घेत पोलिस अधीक्षकांनी तत्काळ वरणगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चौधरी यांची पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केली असून, याबाबतचे आदेश त्यांनी काढले आहे.