कन्नड घाट पुन्हा जाम, चालकांनी शिस्त न पाळल्यास होणार कोंडी
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । कन्नड घाटात दुरुस्तीचे काम अद्यापपर्यंत सुरु आहे. त्यातच हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दुचाकी व छोट्या वाहनधारकांकडून पुढे निघण्याच्या प्रयत्न केला जात असल्यामुळे घाटात वाहतूक कोंडी वाढली आहे. बुधवारी रात्री १० वाजता कन्नड घाट जाम झाला होता. गुरूवारी सायंकाळपर्यंत ही वाहतूक कोंडी न सुटल्याने वाहनधारकांसह महामार्ग पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात दरड कोसळल्याने हा घाट वाहवाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. अडीच महिने बंद असलेला कन्नड घाट दुुरुस्तीनंतर अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी मंगळवारपासून खुला करण्यात आला आहे. असे असले तरी घाटात सध्या दोन ठिकाणी संरक्षण भिंत उभारणीचे व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. घाटातील यू टर्नपासून ते खालपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. म्हसोबा मंदिरापासून ते चाळीसगावच्या दिशेने दोन ठिकाणी रस्ता खचला होता, तिथे संरक्षक भिंत उभारली जात आहे. तसेच रस्ता रुंद केला जात आहे. अशातच प्रशासनाकडून हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला असल्याने सध्या घाटात हलक्या व अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. त्यामुळे घाटात पुन्हा वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. बुधवारी रात्री १० वाजता कन्नड घाट जाम झाला होता. रात्रभर ही वाहतुक कोंडी कायम होती. सकाळीही वाहनांची संख्या वाढल्याने समस्या निर्माण झाली आहे. सायंकाळपर्यंत घाट जाम हाेता. महामार्ग विभागाचे पोलिस कर्मचारी दिवसभर कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिस उपनिरीक्षक भागवत पाटील, हवालदार विरेंद्रसिंग राजपूत, याेगेश बेलदार हे कर्मचारी वाहतूक सुरळीत करत होते.
वाहनचालकांचा बेशिस्तपणा
कन्नड घाटात काम सुरु असलेल्या चार ठिकाणी एकेरी वाहतुक सुरू आहे. त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. घाटात काही कार व दुचाकीचालक पुढे जाण्याच्या प्रयत्नात बेशिस्तपणे आपली वाहने आडवी करतात. त्यामुळे मोठ्या वाहनांना मागे, पुढे वाहने करण्यासही जागा शिल्लक राहत नसल्याने एकाच जागेवर वाहनांची संख्या वाढत जाऊन कोंडी निर्माण होत आहे. दरम्यान, या वाहतूक कोंडीमुळे घाटातील दुरूस्तीच्या कामात अडथळा निर्माण हाेत असल्याने उर्वरीत काम पुर्ण होईपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.