जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे सुरू असलेल्या ‘जळगाव ग्रामीण आमदार चषक’ क्रिकेट स्पर्धेला अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक गालबोट लागले. स्पर्धेचा अंतिम सामना रंगात आलेला असतानाच एका व्यक्तीने चक्क ट्रॅक्टर घेऊन मैदानात प्रवेश केला आणि हजारो प्रेक्षकांच्या देखत थेट खेळपट्टीवर (Pitch) नांगर चालवला. या प्रकारामुळे क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

नेमकी घटना काय?
धरणगावात ‘आमदार चषक’ स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत उत्साहात सुरू होता. खेळाडू विजयासाठी जिद्दीने खेळत होते आणि प्रेक्षक जल्लोष करत होते. मात्र, कुणाला काही कळण्याच्या आतच एका ट्रॅक्टरने मैदानात एन्ट्री केली. सर्वांना वाटले की काही कारणास्तव ट्रॅक्टर मैदानात आला आहे, परंतु चालकाने थेट खेळपट्टीच्या मधोमध नांगर चालवायला सुरुवात केली. काही मिनिटांतच त्याने संपूर्ण खेळपट्टी उखडून टाकली, ज्यामुळे सामना खेळणे अशक्य झाले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भव्य क्रीडा स्पर्धेसाठी स्थानिक स्तरावरील एका राजकीय पदाधिकाऱ्याला आमंत्रित करण्यात आले नव्हते. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या पदाधिकाऱ्याच्या कट्टर समर्थकाने हा टोकाचा पाऊल उचलल्याची चर्चा मैदानावर सुरू होती. राजकीय इर्षेतून खेळाडूंच्या मेहनतीवर नांगर फिरवल्याने आयोजकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.
खेळपट्टीचे नुकसान, सामना रद्द
खेळपट्टी पूर्णपणे उध्वस्त झाल्याने अखेर हा प्रतिष्ठेचा अंतिम सामना रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली. रात्रंदिवस मेहनत करून तयार केलेली खेळपट्टी डोळ्यादेखत उखडली गेल्याने अनेक खेळाडूंनी संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, “हा क्रिकेटचा अपमान आहे” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.या कृत्यानंतर मैदानावर खेळाडू आणि ट्रॅक्टर आणणाऱ्या गटामध्ये बाचाबाची झाली.












