⁠ 
रविवार, मे 5, 2024

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात टोटल हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी

खरगोनच्या तरूणावर अस्थिरोग तज्ञांकडून यशस्वी उपचार

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२४ । खरगोन जिल्ह्यातील ममनाला येथील २५ वर्षीय तरूणावर टोटल हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया अस्थिरोग तज्ञांच्या अथक प्रयत्नाने यशस्वी ठरली. अवघ्या १५ दिवसात हा तरूण पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला आणि चालूही लागला आहे.

याबाबत माहिती अशी की, मध्यप्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील ममनाला येथील जुबेर निर्भान (वय २५) हा तरूण पलंगावरून कोसळला. या घटनेनंतर त्याला चालणे देखिल शक्य होत नव्हते. त्याच्या कुटूंबियांनी त्याला इंदोर येथे वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी भरती केले. त्याठिकाणी सीटी स्कॅन आणि एक्स-रे तपासणी करण्यात आली. या तपासणी अंती त्याच्या खुब्यातील दोन्ही बाजूचे बॉल हे तुटल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यानच्या कालावधीत त्याच्या रक्ततपासण्या केल्या असता त्याच्या क्रीएटीनचा स्तर हा देखिल वाढला होता. त्यावरून त्याला किडनी विकार असल्याचेही निदान झाले. किडनी विकार असतांना शस्त्रक्रिया करणे मोठे अवघड काम होते. अशा परिस्थितीत जुबेरचे अमळनेर येथील मामा सईद तेली यांनी त्याला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात आणण्याचा सल्ला दिला. त्यानुसार जुबेर निर्भान यास त्याच्या कुटूंबियांनी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचारासाठी आणले.

अस्थिरोग तज्ञांकडून यशस्वी शस्त्रक्रिया
जुबेर यास रूग्णालयात आणल्यानंतर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. दीपक अग्रवाल यांनी त्याची तपासणी केली. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याच्या क्रीएटीनचा स्तर कमी करणे गरजेचे होते. त्यानुसार पुर्वीचे वैद्यकीय रिपोर्ट पाहून त्याच्या क्रिएटीनचा स्तर कमी करण्यासाठी त्याला मेडीसीन तज्ञांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात भरती करण्यात आली. त्याच्यावर मेडीसीन तज्ञ डॉ. चंद्रय्या कांते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हेत्वी वैद्य यांनी डायलेसीस करून क्रिएटीनचा स्तर कमी केला. त्यानंतर जुबेर याच्यावर डॉ. दीपक अग्रवाल यांनी टोटल हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करून दोन्ही बाजुच्या खुब्यातील बॉल नव्याने टाकण्यात आले. अवघ्या १५ दिवसात जुबेर हा पुर्वीप्रमाणे त्याच्या पायावर उभा राहिला आणि चालूही लागला. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. चाणक्य, डॉ. प्रसाद बांबरसे यांनी सहकार्य केले.

या शस्त्रक्रियेसाठी अस्थिरोग विभाग, मेडीसीन विभाग आणि डायलेसीस विभाग या तिघांचे अथक प्रयत्न जुबेरसाठी फलदायी ठरले. आयुषमान भारत योजनेत ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. अशा पध्दतीच्या अवघड आणि किचकट स्वरूपाच्या शस्त्रक्रियांसाठी सहाय्य ठरणारे विविध विभाग हे डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात एकाच छताखाली असल्याने शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. या शस्त्रक्रियेमुळे आता जुबेर हा त्याच्या पायावर पुन्हा उभा राहिल्याचे समाधान आहे.

  • डॉ. दीपक अग्रवाल,
    अस्थिरोग विभागप्रमुख,डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.